सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध गुंतवणूक भविष्यासाठी फायद्याची : कौस्तुभ जोशी
नागपूर :- सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध गुंतवणूक करत राहिल्यास, उत्तर आयुष्यात त्यातून थोडे थोडे काढून ते आयुष्यभर पुरू शकते, अशी किमया घडवून आणणारे ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’ म्हणजे अक्षय्य ऊर्जास्रोतच आहेत, असे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले.
निवृत्तीपश्चात नियोजनाच्या मधुर फळांचा आस्वाद घेण्यासाठी दीर्घकाळात जोखीम-गुंतवणूक ताळमेळ राखत मार्गक्रमण गरजेचे आहे. अर्थात गुंतवणुकीचे हे नियोजन कमीत कमी पाच ते सात वर्षांचे असायला हवे, असे जोशी म्हणाले. नोकरीला लागल्यापासून, निवृत्त जीवनाविषयी नियोजनाच्या दिशेने गुंतवणुकीला सुरुवात करणे आदर्शवत ठरेल, असे त्यांनी पगारदारांना उद्देशून सूचित केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुंतवणूकदारांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्त्यांनी केले. लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक गौरव मुठे यांनी वक्ते आणि श्रोते यांच्यातील दुवा आणि सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
चौकट
सध्याच्या काळात आर्थिक शिस्त पाळणे निकडीचे आहे. विशेषत: पगारदार व्यक्तींनी आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या अर्थसाक्षरता कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यानुसार आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली पाहिजे. – राधाकृष्णन बी.,आयुक्त, नागपूर महापालिका