यवतमाळ :- राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामाईक न्युनतम कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छ. संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर होते. मार्गदर्शक म्हणून प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार, वक्ते म्हणुन कोप्टाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. निकीता गायकवाड व शासकीय रूग्णालयाच्या डॉ. मनाली बागडे उपस्थित होत्या. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू ही जगभर असलेली गंभीर समस्या आहे, असे सांगत तंबाखू सेवन कमी होण्यासाठीच्या प्रयत्नांना तंबाखूमुक्त राहून हातभार लावूया, असे सांगितले.
डॉ.निकीता गायकवाड यांनी धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू ही जगभर असलेली गंभीर समस्या आहे. तंबाखूमध्ये निकोटीन व अन्य अनेक हानिकारक व कर्करोगास कारणीभूत रसायनांचा समावेश आहे. जेव्हा तंबाखू खाणारा व्यक्ती तंबाखू हाताळतात तेव्हा त्यांना ग्रीन टोबॉको सिकनेस हा आजार होऊ शकतो. तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये स्त्रिया आणि मुलेही काम करताना आढळतात. गरोदर स्त्रिया तंबाखू उत्पादन व विक्री करणाऱ्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे सांगितले.
शरीरातील जवळ जवळ प्रत्येक अवयवावर तंबाखूचा दुष्परिणाम होऊ शकतो. विविध आजारांसाठी तंबाखू सेवन एक धोक्याचा घटक आहे. असंसर्गजन्य आजार यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत असल्याचे शास्त्रीय अभ्यासात नमूद केले आहे, असे डॅा.गायकवाड यांनी सांगितले. डॉ. मनाली बागडे यांनी तंबाखू व सिगारेटमुळे शरिरावर होणारे दुष्परिणामावर जागरूकता होणे महत्वाचे आहे, असे सांगितले. कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन हानिकारकच आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल प्रत्येकाने जागरूक राहून तंबाखू सेवन सोडणे महत्वाचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार पॅनल वकील अँड. वैशाली शेंदरे यांनी केले. कार्यक्रमाकरीता पॅनल वकील, न्यायालयीन कर्मचारी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.