यवतमाळ :- सर्वच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. याच धर्तीवर तेली समाज, भोई समाज आणि बारी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील तेली आणि भोई समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवून त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजाच्या विकासासाठी शासनाने महामंडळ स्थापन करावे, अशा आशयाचे निवदेन दिले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी तेली, भोई आणि बारी समाज महामंडळासाठी आपण स्वत: प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.
महाराष्ट्रात भोई समाज विविध नावाने ओळखला जातो. या सर्व समाजाला महामंडळामध्ये समाविष्ट करून लाभ देण्याची मागणी यावेळी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हिम्मत मोरे यांनी केली. तर, मध्यप्रदेश सरकारने तेली समाजाच्या उन्नतीसाठी तेलघाणी महामंडळ स्थापन केले. याच धर्तीवर महाराष्ट्रात तेली समाजाच्या विकासासाठी श्री संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी तेली समाजबांधवांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली.
महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती, कौशल्यविकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे तसेच समाजातील बेरोजगारांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी, अशी आपली धारणा आहे. तेली समाजासाठी श्री संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ, भोई समाजासाठी भीमाभोई आर्थिक विकास महामंडळ आणि बारी समाजासाठी रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आपण स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतूल सावे यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावू, असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी शिष्टमंडळास दिला.
पालकमंत्री संजय राठोड यांना तेली समाजाच्या वतीने भाऊराव ढवळे यांच्या नेतृत्वात प्रभाकर गुल्हाने, राजू देऊळकर, नीलेश पजगाडे, रवी देऊळकर, भरत पिसे, सुरेश वडतकर, ज्ञानेश्वर रायमल, किशोर सुरकर, भाऊ महिंद्रे, अनिल जिभकाटे आदींनी निवेदन दिले. भोई समाजाच्या वतीने हिंमत मोरे यांच्या नेतृत्वात शुभम रावते, किशोर नागपूरे, पंकज सोनोणे, त्र्यंबक मांढरे, दादाराव माहुरे, पुंडलिक बावणे आदींनी निवेदन दिले.