नवी मुंबई :- महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोंकण भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा फुले हे भारतातील थोर समाजसुधारक, शिक्षणप्रणेते आणि स्त्री-शूद्र उद्धारक होते. त्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने देशात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ‘सत्यशोधक समाज’ स्थापून त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध प्रभावी चळवळ उभारली. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुषातील विषमता आणि धार्मिक रूढींविरुद्ध लढा दिला.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. स्त्रियांसाठी आश्रयगृह (स्त्री आत्मसुरक्षा केंद्र) सुरू केले. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक समतेचे, शिक्षणाचे आणि सत्यशोधक विचारांचे प्रतीक होते. त्यांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे.