नागपूर :-महान क्रांतिकारक भाई परमानंद यांच्या स्मृतीदिनी, 8 डिसेंबर 2022 रोजी महाल येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी भाई परमानंद यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करून अभिवादन केले. याप्रसंगी अरूण जोशी म्हणाले, भाई परमानंद एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. आर्यसमाज व वैदिक धर्माचे कट्टर प्रचारक होते तसेच थोर क्रांतिकारक सरदार भगतसिंग, सुखदेव, पं. रामप्रसाद बिस्मिल सारखे असंख्य राष्ट्रभक्त युवकांचे भाई परमानंद प्रेरणास्थान होते अंदमानच्या कोठडीत त्यांनी असहनीय यातना भोगल्या.
अखंड हिंदूस्थानचे विभाजन होऊन पाकिस्तानच्या निर्मितीची भविष्यवाणी 1930 मध्येच भाई परमानंद यांनी केली होती. त्यांच्या सोबत श्यामजी कृष्ण वर्मा, विनायक दामोदर सावरकर असे अनेक क्रांतिकारक सक्रिय होते. हिंदू महासभेचे काम करतांना पं. मदन मोहन मालवीय ह्यांचा सहयोग त्यांना नेहमी मिळाला. 1933 मध्ये अजमेर येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तरूण युवकांनी भाई परमानंद यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. वंदे मातरम्च्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय करांगळे, अनंत पाध्ये, कैलास शेजोळे व हिंदू महासभेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.