नागपूर :-हिंदू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि स्वातंत्र्यता सेनानी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त दि. 25 डिसेंबर, 2022 रोजी हिंदू महासभेच्या टिळक रोड, महाल, नागपूर येथील कार्यालयात सर्वप्रथम हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अरूण जोशी म्हणाले की, हिंदूस्थानला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बंगालमध्ये अनेक हिंदूंचे धर्मांतरण केल्या गेले. पंडित मदनमोहन मालवीय यांनी धर्मांतरण झालेल्या हिंदूंना आपल्या धर्मात घेण्याचे मोलाचे कार्य केले. हिंदूस्थान ही आपली मातृभूमी आहे. हिंदू धर्म हा महान आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येकाचे आचरण असायला पाहिजे असे ते नेहमी सांगत. हिंदू महासभेच्या माध्यमातून त्यांनी असंघटीत हिंदूंना संघटीत करून राष्ट्रकार्यास प्रेरित केले. त्यांचा राष्ट्रवाद राजनितिकनसून तो हिंदू धर्म आणि तात्विक सिंद्धांतावर आधारित होता.
अरूण जोशी पुढे म्हणाले, देशाच्या विभाजनाला पंडित मदनमोहन मालवीय यांचा सक्त विरोध होता. त्यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना करून त्या माध्यमातून फार मोठे राष्ट्रकार्य केले. त्यावेळचे हिंदू महासभेचे नेते डॉ. बा. शि. मुंजे, डॉ. भगवानदास यांच्याशी त्यांचे घनिष्ट संबंध होते. अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षीय स्थान त्यांनी भुषविले होते.
कार्यक्रमास डॉ. जयदीप घोष, डॉ. बाबुलाल धोत्रे, शंकरराव वैद्य, अनंत पाध्ये, कैलास शेजोळे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वंदेमातरम्च्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला.