– हिवाळी अधिवेशनात स्वागतासाठी फुलझाडेही सज्ज
– तीन महिन्यांपूर्वीच केली होती लागवड
– पुण्याहून मागविली हंगामी फुलझाडे
– विविध रंगाच्या फुलझाडांनी सजला परिसर
नागपूर :-कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापले असले तरी हिरवेगार गालिचे आणि विविध रंगांच्या फुलझाडांना पाहिल्यास मन अगदी शांत होते तसेच परिसराची शोभा वाढते. असाच उद्देेश ठेवून विधान भवनात हिरवळ आणि विविध रंगाच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली. आता हिरवेगार गालिचे तयार झाले असून विविध रंगाच्या फुलांना बहार आला आहे. विविध रंगानी नटलेली फुलझाडे जणू पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. असेच चित्र रामगिरी, देवगिरी येथेही पाहावयास मिळते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामित्त राज्य शासनाच्या उपवने व उद्याने विभागातर्फे हिरवळ आणि विविध रंगांच्या आणि विविध जातींच्या फुलझाडांची लागवड केली जाते. हिवाळी अधिवेशनात फुलांना बहर येईल आणि हिरवेगार गालिचे तयार होतील, या बेताने तीन महिन्यांपूर्वीच तयारी करण्यात आली. त्या अनुषंगाने विधान भवन, रामगिरी, देवगिरी, रवि भवन, नाग भवन, हैद्राबाद हाऊस, मंत्र्यांचे बंगले या ठिकाणी हिरवळ आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली. खतपाणी घालून हिरवळ तयार करण्यात आली आहे.
याशिवाय हंगामी फुलझाडे पुण्याच्या हडपसर आणि तळेगाव येथून मागविण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. एक डिसेंबरपर्यत हंगामी फुलझाडे येतील. यात शेवंती, रक्तपर्णी, सायप्रस, पाम, झेंडू, सालविया, झिनिया, कॉसमॉस, सदाफुली या फुलझाडांचा समावेश आहे. विविध प्रकारचे वेल यात फायकस, क्रोटॉन्स तसेच कुंड्यांमधील शोभिवंत झाडे, इनडोअर वेलवर्गियात मनी प्लांट, ऑक्सीकार्डियन, फायलोडेन्डरम, ड्रेसिना, अरेका पाम, अॅग्लोनेमा, डायफेनबेकिया आदी प्रकारातील झाडे येणार आहेत. इनडोअर आणि कुंड्यांमधील झाडे मंत्र्यांच्या केबीनमध्ये तर फुलझाडे परिसराची शोभा वाढवतील.
हिरव्यागार गालिच्यांभोवती सुंदर फुलझाडे
हिवाळी अधिवेशनात फुलांना बहर येईल आणि हिरवेगार गालिचे तयार होतील, या बेताने तीन महिन्यांपूर्वीच तयारी करण्यात येते. हंगामी फुलझाडे, इनडोअर वेल, कुंड्यामधील शोभिवंत झाडे पुण्याच्या हडपसर आणि तळेगाव येथून मागविण्यात आली आहेत. एक डिसेंबरपर्यंत ही फुलझाडे विभागाच्या नर्सरीत येतील. या फुलझाडांनी परिसराची शोभा वाढेल.
प्रसाद कडुलकर, सहायक संचालक (उपवने व उद्याने)