नागपूर :- ‘राष्ट्रीय हातमाग दिना’च्या औचित्याने विभागीय आयुक्त परिसरातील प्रशासकीय ईमारत क्र.२ येथे आयोजित हातमाग वस्तुंच्या एक दिवसीय प्रदर्शनास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालायच्यावतीने १० व्या राष्ट्रीय हातमागदिनाच्या औचित्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हातमाग विणकरांना आधार देणे आणि या क्षेत्राचे सामाजिक, आर्थिक महत्व अधोरेखित करणे हे या आयोजनाचे उद्दिष्टय आहे. वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली.
प्रदर्शनात टसर, सिल्क आणि कॉटन पासून बनलेल्या साड्या, अहिंसा सिल्क, बेडशीट, टॉवेल्स, नॅप्किन, मिश्रित फॅब्रिक्स्- बांबू आदी वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी लावण्यात आल्या होत्या. परिसरातील विविध कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देवून हातमाग वस्तुंची पाहणी व खरेदी केली.
तत्पूर्वी, ७ ऑगस्ट या राष्ट्रीय हातमाग दिनी येथील देवनगर परिसरातील ‘मकेएसएस स्कुल ऑफ टेक्नोलॉजी येथे आयोजित विशेष कार्यक्रमाचे वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा आणि रेशीम संचालनालयाच्या संचालक वसुमना पंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
वस्त्रोद्योग आयुक्तालय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर आणि बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ‘खादी टसर स्पन आणि धातूकोष’ या वस्त्र संकल्पनेवर आधारीत ‘फॅशन शो’, विद्यार्थ्यांकरिता प्रश्न मंजुषा पार पडली. ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण सन २०२३-२०२८’ अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरणही करण्यात आले.