– मनपात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली “तिरंगा प्रतिज्ञा”
– ९ ते १५ ऑगस्टपर्यंत अभियान : देशभक्तीच्या वातावरणात रंगणार नागपूर
नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचा नागपूर महानगरपालिकेमध्ये थाटात शुभारंभ झाला. अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेत ‘तिरंगा प्रतिज्ञा’ घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना ‘तिरंगा शपथ’ दिली.
सदर अभियान देशवासीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना वृदिंगात करेल तसेच राष्ट्रध्वजाप्रती अधिक सन्मान जागृत करेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर सुरू असलेले हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यावर्षी देखील नागपूर शहरात मोठ्या उत्साहाने अभियान राबविण्याचा निर्धार मनपातर्फे करण्यात आला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी “मी शपथ घेतो की, मी आपला तिरंगा ध्वज फडकवेल, स्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्म्ये यांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन.” या आशयाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्तद्वय आंचल गोयल, अजय चारठाणकर, उपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री. हरिश राऊत, प्रमोद वानखेडे, श्याम कापसे, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी, चंदनखेडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, उद्यान अधीक्षक अमोल चौरपागर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यात नागपूर शहराचाही उत्स्फूर्त सहभाग राहील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहे, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा दौड, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा शपथ, तिरंगा सेल्फी, तिरंगा मानवंदना, तिरंगा मेला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांचे योग्यरित्या नियोजन करून यामध्ये विद्यार्थी, नागरिक, महिला या सर्वांनाच सहभागी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे, असे ही मनपा आयुक्तांनी सांगितले.
शहरातील प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारुन येथे नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता दहाही झोन सह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.
‘हर घर तिरंगा’अभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसेच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे ही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला दिले आहे.
सेल्फीसाठी मनपात तिरंगा
‘घर हर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर घराघरात पोहोचविला जात आहे. या अभियानामध्ये सहभागी होउन तिरंग्यासोबत सेल्फी काढून ती हर घर तिरंगा च्या संकेतस्थळावर अपलोडक करण्याचे दिशानिर्देश केंद्र शासनाद्वारे जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सेल्फीसाठी मनपा मुख्यालयात तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. या तिरंग्यासोबत सेल्फी काढून अधिकारी आणि कर्मचारी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत.