रामटेक :- अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामटेक च्या वतीने स्थानिक न.प.बालोद्यान येथील प्रार्थनाकुंज येथे ग्राम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पहिल्या दिवसाच्या पहाटे ‘ तिर्थस्थापना व ध्यान ‘ ने झाली. दुपारच्या सुमारास महिला भजनासोबत ग्रामगिता या ग्रंथावर मोरेश्वर माकडे गुरुजी यांचे प्रबोधन झाले. सायंकाळी पुरषभजनी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शहरातील पाच भजन मंडळांनी यात सहभाग घेतला होता. दुसऱ्या दिवसाची सुरवात पहाटेच्या सुमारास सामुदायिक ध्यान व प्रार्थना याने झाली. ह.भ.प. शेंडे महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रामधुन चे आयोजन करण्यात आले होते. बालगोपाल आबालवृद्ध तसेच महिला मंडळींनी रामधुन मध्ये सहभागी होऊन हातात झाडु, पावडे घेऊन ग्रामसफाई केली. रामधुन मंदिरात आल्यानंतर शेंडे महाराज द्वारे काल्याचे किर्तन झाले. शेवटी राष्टवंदना होऊन महाप्रसादाला सुरवात झाली. विशेषतः या कार्यक्रमाला सर्वांनी आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याची शपथ वंदनीय महाराजासमोर घेतली व शेवटी कार्यक्रमाचा समारोप झाला. या ग्रामजयंती महोत्सव ला यशस्वी करण्यासाठी अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री कुर्वे गुरुजी, मोहोळ गुरुजी, एकनाथ उईके, डडोरे महाराज, राजु देशमुख, श्रीधर पुंड, धनराज महाजन, नंदू नेरकर, रामा खोलकुटे, विक्की पुंड, महेश सुरुसे, विठ्ठलवार, सचिन भिलकर, करण कटुकाळे, नंदू पापडकर, महेश किरणाके, सोहम देशमुख , राजेंद्र मेंगरे, विघ्नेश सुरुसे, सतीश सुरसे तसेच कांचनमाला माकडे, मिरासे बावनकर, जांभुळकर आदिंनी सहकार्य केले . शाहीर परिषदेचे पदाधिकारी , प्राध्यापक मोडघरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी सहकार्य केले .