विद्यापीठांमध्ये ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय शिकविला जावा – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली अपेक्षा

– लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच पर्यावरण संवर्धनाची त्रिसूत्री – आ.मुनगंटीवार

– ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज – २०२५’चे उद्घाटन

चंद्रपूर :- शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण असा विषय प्रत्येक विद्यापीठात शिकविला जावा त्यातून पर्यावरणतज्ज्ञ तयार होतील. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना जन्माला येतील. नवे प्रयोग होतील आणि त्यातूनच संवर्धनाचे नवनवे मार्गही गवसतील, असा विश्वास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-2025’चे गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२५) महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एसएनडीटीच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव,आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, युएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, ‘चंद्रपूरमध्ये होत असलेल्या परिषदेतून मोठी जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. कुठलेही चांगले काम करण्यासाठी पहिले चांगली मानसिकता आणि मनाची तयारी आवश्यक असते. तसे असेल तर नक्कीच यश मिळते. कुणी एका रात्रीत जग बदलू शकत नाही. प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल असते. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित करण्यासाठी अविरत कष्ट करावे लागणार आहेत.’लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. आपण आधुनिकतेकडे वळतोय. पण त्याला मर्यादा असली पाहिजे. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण या पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये,’ असेही राज्यपाल महोदय म्हणाले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली त्रिसूत्री

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, ‘यंदा संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क सर्वांना माहिती आहेत. पण संविधानाने दिलेल्या जबाबदारीचा, आपल्याला सांगितलेल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे. तीन दिवसांच्या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या कर्तव्यावर चर्चा होईल असा विश्वास आहे. त्यासाठी लोकशिक्षण, संशोधन, कृती आणि अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे.’ सी फॉर चंद्रपूर, सी फॉर क्लायमेट चेंजच्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खूप झाल्या चर्चा; आता कृती हवी’

या परिषदेत फक्त भाषण ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होईल. चिंता व्यक्त होईल. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये, असा माझा आग्रह आहे. तीन दिवस चर्चा अवश्य करा. पण ज्ञान पुस्तकात बंद असेल तर त्याचा उपयोग नसतो. क्लायमेट चेंजवरही आजवर खूप परिषदा झाल्या. पण अंमलबजावणी होत नाही. आपल्याला कृती करायची आहे आणि उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. जेणेकरून जेव्हा क्लायमेट चेंजचा इतिहास लिहिला जाईल, तेंव्हा त्यात चंद्रपूरचे नाव असले पाहिजे असेही ते म्हणाले.

पर्यावरण संवर्धन हे लोकआंदोलन व्हावे

पर्यावरण संवर्धनाचा विषय चंद्रपूरच्या चर्चेपर्यंत राहणार नाही. याचे रुपांतर लोकआंदोलनात होईल, असा मला विश्वास आहे. मी महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लावले, त्याचा परिणाम आज बघायला मिळतोय. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये राज्याचे ग्रीन कव्हर २ हजार ५५० चौरस किलोमीटर वाढल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात मँग्रोव्ह (कांदळवन)चे क्षेत्र वाढले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी असेच प्रयत्न आवश्यक आहे. भविष्यात मी याच विषयाला घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Jan 17 , 2025
मुंबई :- ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन ‘बीकेसी’तील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!