44 वर्षांपूर्वीचा लॉन्गमार्च : उत्तम शेवडे

मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकमताने पास करण्यात आला. त्या ठरावाची (घोषणेची) अंमलबजावणी करावी यासाठी आजपासून 44 वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात 11 नोव्हेंबर 1979 रोजी नागपूर ते औरंगाबाद असा लॉन्गमार्च काढण्यात आला होता.

या लॉंगमार्च मध्ये नागपूर व परिसरातील हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. हा पायी मार्च 11 नोव्हेंबरला नागपूरच्या दीक्षाभूमी वरून निघाला तो बुट्टीबोरी, केळझर, वर्धा, देवळी, कळम, यवतमाळ, बोरीअरब, चिखली, कारंजा लाड, मंगरूळपीर, बिटोडा, वाशिम, मालेगाव, डोनगाव, मेहकर, बीबी येथे मुक्काम करत करत या मार्च ने 17 दिवसात 365 किलोमीटरचे चे अंतर पाई कापले.

जिजाऊंचे माहेरघर सिंधखेड राजा येथे पोहोचण्यापूर्वीच लॉन्ग मार्चला दुसरबीड शेजारच्या राहेरी येथील पुलावर 27 नोव्हेंबरला अटक करण्यात आली. व त्यानंतर त्यांना 30 नोव्हेंबर रोजी नागपूर कारागृहात बंद करण्यात आले. व 12 डिसेंबर रोजी कारागृहातून मुक्त करण्यात आले.

प्रा जोगेंद्र कवाडे यांना मात्र अमरावती येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. नागपुरात 6 डिसेंबर 1979 रोजी त्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांनी बलाचा वापर करून, जनतेच्या अंगावरून गाडी चालवून अनेकांना जखमी केले व एवढेच नाही तर गोळीबार करून अनेकांचे जीवही घेतले.

नामांतराचा हा संघर्ष 16 वर्षे चालला आणि त्यानंतर 14 जानेवारी 1994 ला त्याच शरद पवार सरकारने मागणी नसतांना त्या मराठवाडा विद्यापीठाचे दोन तुकडे केले व त्यातील एका तुकड्याचे नामांतर करण्याऐवजी त्याचा नामविस्तार केला. या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असलेले बसपा नेते उत्तम शेवडे यांनी लाँगमार्च व नामांतरातील आपल्या काही आठवणींना उजाळा दिलेला आहे.

उत्तम शेवडे हे 17 दिवस पायी चाललेल्या मार्चमध्ये होते. तर तेरा दिवस ते नागपुरातील कारागृहात राजकैदी म्हणून सर्व भीमसैनिका सोबत होते. या आंदोलनाने ते पूर्ण परिपक्व होऊन निघाले. यावेळी त्यांनी समाजातील उद्रेक, आंबेडकरी मानसिकता, जातीयवादी मानसिकता, ग्रामीण जीवन, ग्रामीण मानसिकता, त्यांची आर्थिक स्थिती, आंबेडकरी चळवळीवर असलेले प्रेम, नेत्यावर असलेले प्रेम, कार्यकर्त्यां विषयीचा आत्मविश्वास, ऊन-वारा -पाऊस अश्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता या आंदोलनात सहभागी असलेल्यांमध्ये निर्माण झाली.

दक्षिण नागपुरात आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजल्या गेलेल्या चंद्रमणी नगरातून मी आणि माझे मित्र भीमराव धनविजय यांना लॉन्गमार्च मध्ये सहभागी होण्यासाठी 20, 20 रुपये वर्गणी देऊन वाजत गाजत दीक्षाभूमीवर वसाहतीतील नागरिकांनी पोहोचवले होते. माझ्याकडे असलेले ते वीस रुपये आणि मनी ऑर्डरने मागवलेले पाच रुपये असे 25 रुपये एक महिन्यात खर्च झाले, त्याचा हिशोब आजही माझ्या नोंदवहीत आहे.

मी लॉन्गमार्च च्या सर्व दैनंदिन नोंदी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी लिहीत असे. आजही ती डायरी माझ्याकडे सुरक्षित आहे. या डायरीत कवाडे सरांची भाषणे, त्यांना भेटी देणाऱ्या व स्वागत करणाऱ्या लोकांची व गावांची नावे, मार्गात लागणारी गावे, त्यांची लोकसंख्या, कोण कोणत्या गावात कशाप्रकारे स्वागत झाले, कशाप्रकारे भोजन मिळाले, कुठे भोजन मिळाले नाही, कुठे पावसाने स्वागत केले, कुठे आकाशाचा बिछाना झाला, आदि विविध प्रकारच्या नोंदी या डायरीत आहेत. लॉन्ग मार्चमध्ये गायली जाणारी क्रांती गीते आजही मुखावर आहेत.

लॉन्गमार्च निघण्यापूर्वी नामांतराचा ठराव पास होताच मराठवाड्यातील जातीयवादी मंडळींनी दलितांची घरे जाळली त्या घटनेच्या निषेधार्थ नागपुरात काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 4 व 5 ऑगस्ट 1978 ला नागपुरात अनेक शहीद झाले. त्यानंतर लॉंगमार्च निघाल्यावर 16 वर्ष चाललेल्या आंदोलनात अनेक शहीद झाले. या दोन्ही घटनेतील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ दहा नंबर पुल इंदोरा नागपुर येथे शासनाच्या वतीने नामांतर शहीद स्मारक बांधण्यात आले. त्या स्मारकावर 4 आगस्ट रोजी आंबेडकरी जनता नतमस्तक होण्यासाठी जात असते.

यावेळी मी बारावीची परीक्षा फेल झालो. मी 1980 ला नामांतराचा ट्रॅक बदलला व कांशीरामजी यांच्या नेतृत्वातील चळवळीत सहभागी झालो. त्या चळवळीने सत्ता हातात घेऊन अनेक विद्यापीठे दिली. समाजाला जर काही हवे असेल तर मागणारे ऐवजी देणारे बना आणि देणारे हे हे शासक असतात व फुले-शाहू- आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हत्ती सारख्या शक्तीचं बळ शासक बनण्यासाठी वापरले पाहिजे.

उत्तम शेवडे (9421800219)

लॉन्गमार्च मधील भीमसैनिक

NewsToday24x7

Next Post

कोदामेंढी अरोली येथील सूर नदीतून रेतीची अवैधरित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर विशेष पथकाची कार्यवाही

Mon Nov 13 , 2023
नागपूर :- पोलीस अधिक्षक यांचे विशेष पोलीस पथक नागपूर ग्रामीण यांनी दि. १०/११/ २०२३ रोजी पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने अवैध धंद्यावर रेड करणेकामी खाजगी वाहनाने रवाना होउन पोस्टे अरोली परीसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त खात्रीशीर खबर मिळाली की, कोदामेंढी शिवारात असलेल्या सुर नदीच्या पात्रात ट्रॅक्टर द्वारे अवैध्यरित्या रेतीची चोरटया मार्गाने वाहतुक करीत आहेत. अशा बातमीवरून विशेष पथकाने कोदामेंढी सुर नदीवरील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com