– उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जिजाऊ कमर्शियल बँकेच्या शाखेचा स्थानांतरण सोहळा
नागपूर :- जनतेच्या पैशांचे विश्वस्त म्हणून बँका कार्य करीत असतात. यापुढे जावून विविध योजनांच्या माध्यमातून बँकांच्या मदतीने सामान्य माणसाला आर्थिक समावेशनामध्ये आणण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ कमर्शियल को.ऑप. बँक लि. शाखेचे येथील भामटी परिसरात स्थानांतर झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार विकास ठाकरे, बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश कठाळे, संस्थापक उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात बँकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. जिजाऊ कमर्शियल को.ऑप. बँकेनेही आपल्या कार्यक्षेत्रातील खातेदारांना उत्तम सेवेद्वारे देशकार्यात योगदान दिले आहे. या बँकेचा ताळेबंद बघता आरबीआयच्या सर्व मानकावर उत्तम कागगिरी केल्याचे दिसून येते असे सांगत आई जिजाऊचे नाव या संस्थेला असल्याने ही बँक अधिक प्रगती करेल, अशा शुभेच्छाही दिल्या.
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने यावेळी फडणवीस यांच्या हस्ते बँकेच्या दोन महिला कर्मच्याऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अविनाश कठाळे यांनी प्रास्ताविक केले तर बँकेचे संचालक बबन आवारे यांनी आभार मानले.