वीज मंडळ खासगीकरणाबाबत सरकारची मोठी घोषणा; कंत्राटी कामगारांना

नागपूर (Nagpur) : महावितरण कंपनीमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक कामगारांची जवळपास २६,६४८ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांना सेवेत थेट घेता येत नसल्याने भरती प्रक्रियेत कंत्राटी कामगारांना प्रत्येक वर्षी अधिकचे गुण देऊन प्राधान्य देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा सरकारचा विचार नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी सांगितले की, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये लाईटमन तथा तत्सम कामगारांची पदे नाहीत. मात्र राज्य शासन लवकरच महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करणार आहे. यामध्ये कंत्राटी कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा महामंडळाच्या पद्धतीने विमा संरक्षण देण्यात येईल. प्रत्येक वर्षी पाच गुण देऊन गुणवत्ता यादीवर येण्यासाठी प्रयत्न केले जातील.

महानिर्मिती कंपनीमध्ये कंत्राटदाराच्या अधिनस्त अंदाजे १७,४४३ कंत्राटी कामगार कार्यरत असून महापारेषण व महावितरणमध्ये सर्वसाधारणपणे अनुक्रमे ३,९४० व २१,५५१ कंत्राटी कामगार बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून काम करतात. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार प्रासंगिक तसेच तात्पुरती कामे कंत्राटदाराकडून टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून करून घेतली जातात. प्रत्येक वेळेस कंत्राटदार नेमताना बाह्यस्त्रोत कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा केले जाण्याची अट टेंडर तसेच संबंधित कंत्राटदाराच्या कार्यादेशामध्ये अंतर्भूत केली जाते. मात्र कंत्राटदार कमी वेतन देतात, याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कंत्राटी कामगारांना त्यांच्या बँक खात्यात थेट वेतन दिले जाईल. कंपनी अधिनियमानुसार किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यासाठी वेतन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. शिवाय वीज मंडळाचे कोणत्याही स्थितीत खाजगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, अनिकेत तटकरे, सचिन आहेर आणि अनिल परब यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मी मुंबईचा 'असा' कायापालट करणार की तुम्ही पाहात राहाल!

Sat Dec 24 , 2022
नागपूर (Nagpur) : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आणि आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. मुंबईच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!