नागपूर :- विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी उपस्थिती लावली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कधी यायचे,कोणत्या दिवशी यायचे, यासंदर्भातील वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला याची माहिती आहे. ही भरती प्रक्रिया रात्री 12 नंतर राबविली जाणार असल्यामुळे जिल्हा स्थानावरून विशेष प्रवासव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन या ठिकाणावरून मानकापूर विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी पोहोचण्यासाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
रात्री उशिरा ही निवड प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या सकाळी चाचणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्त्याची व दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. याशिवाय मानकापूर क्रीडा संकुल परिसरात गेट क्रमांक एक ते गेट क्रमांक दोन पर्यंत विश्रांतीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले असून मोबाईल टॉयलेट उपलब्ध आहेत. उमेदवारांनी शिस्तीने या सर्व सुविधांचा वापर करावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही दिवस सैन्य भरतीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून पावसाने व्यत्यय न आणल्यामुळे नियमितपणे चाचणी परीक्षा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसात जवळपास सात हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा पूर्ण झाली आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील जवळपास 60 हजार विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत नोंदणी केली आहे.