Ø जिल्हा प्रशासनाकडून ओजसच्या आई-वडीलांचे अभिनंदन
नागपूर :- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके मिळवून देत नागपूरचे नाव जगात उंचावणाऱ्या ओजस देवतळेची कामगिरी सर्व नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ओजस निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी तेजसच्या कामगिरीचे कौतुक केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ओजसच्या आई-वडिलांचे दूरध्वनीवरून कौतुक केले होते. तिसरे सुवर्णपदक मिळवल्यानंतर प्रशासनाच्यावतीने आज जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाचे उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड गटात वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले. तत्पूर्वी मिश्र आणि सांघिक प्रकारतही त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. तेजसच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल डॉ. इटनकर यांनी तेजसच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, उपविभागीय अधिकारी हरिश भामरे यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंदाजी, कबड्डी, स्केटिंग, उंच उडी आदीसारख्या कमी जागेत सराव होऊ शकणाऱ्या खेळासाठी गल्लीबोळीतील खुल्या जागेवर, तसेच मोठ्या शाळेतील मैदानांवर खेळाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला 100 कोटी आणि जिल्हास्तरावरील अद्यावत स्पोर्टस कॉम्पलेक्स साठी मानकापूर स्टेडिअमला 500 कोटीचा निधी राज्यअर्थसंकल्पात मंजूर केला असल्याचे डॉ. इटनकर यांनी यावेळी सांगितले. खेळाडूंना पुढे येण्यासाठी शासन नेहमीच मदतीला तत्पर असल्याचे ते म्हणाले.
ओजसने नागपूरच्या मुलांना दिशा दाखवली असून नागपूरच्या क्रीडा जगताला यामुळे उभारी येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी ओजसचे वडील प्रवीण देवतळे, आई अर्चना, काकू राधिका, काका विनय व मोहन देवतळे, लहान भाऊ यथार्थ व व्योम आदी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.