– नेर येथील आरोग्य शिबिराचा दीड हजारावर रुग्णांनी घेतला लाभ
यवतमाळ :- ‘मी राजकारणापेक्षा समाजकारणाला कायम प्राधान्य दिले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून नागरिकांना आरोग्य शिबिरातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सातत्याने करतो. या शिबिरातून नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान व हास्यात मला माझा देव दिसतो’, असे भावोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.
माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवारी नेर येथील नेहरू महाविद्यालयात आरोग्य संकल्प अभियानांतर्गत अतिविशेष उपचार व मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार, औषधी वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संजय राठोड बोलत होते.
यावेळी पराग पिंगळे, परमानंद अग्रवाल, नामदेव खोब्रागडे, भाऊराव ढवळे, मनोज नाल्हे, मजहरभाई, रितेश चिरडे, वैशाली मासाळ, अर्चना इसाळकर, सुमीत खांदवे, गजानन भोकरे, सुभाष भोयर, नीलेश शेळके, दीपक आडे, रुपेश गल्हाने आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कायकर्ते आदी उपस्थित होते. शिबिरात नेर तालुक्यातील एक हजार ६७९ रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला.
पुढे बोलताना ना. संजय राठोड म्हणाले, अनेकदा आर्थिक परिस्थितीअभावी रूग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्यातून आरोग्यात अनेक गुंतागूंत निर्माण होते. आपल्या मतदारसंघातील एकही व्यक्ती उपचारांशिवाय राहू नये, सर्वांना उत्तम उपचार मिळावे यासाठी दर तीन महिन्यांनी दिग्रस, दारव्हा, नेर येथे हे अतिविशेष आरोग्य शिबिर घेण्यात येते. हे शिबिर कोण्या एका समुदायासाठी नसून सर्व जाती, धर्मातील नागरिकांसाठी असल्याचे ना. राठोड यांनी यावेळी सांगितले.
या आरोग्य संकल्प अभियान शिबिरात नेर तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या एक हजार ६०० च्या वर रूग्णांची तपासणी करण्यात येवून औषधोपचार करण्यात आले. विविध गंभीर आजार असलेल्या रूग्णांची विशेष नोंद घेवून त्यांच्यावर सावंगी (मेघे) येथे उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी रूग्णांना तारीख व वेळ देण्यात आली. या रूग्णांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयामार्फत सावंगी येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. रूग्ण व त्याच्या सोबतच्या एका नातेवाईकाची येण्या जाण्याची, भोजन व राहण्याची मोफत व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. रुग्णांचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात येणार असून योजनेत न बसणाऱ्या रूग्णांच्या उपचारांचा खर्च आयोजकांतर्फे केला जाणार आहे.
आजच्या शिबिरात मेडीसिन, हृदयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, बालरोग, कान, नाक, घसा, श्वसनरोग, मानसिक विकाररोग, मेंदूविकार, दंत व मुखरोग, युरो (किडनी), कर्करोग, मूत्ररोग, पोटविकार आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी करून उपचार केले. रूग्णांना शिबिरातच औषधींचे मोफत वाटप करण्यात आले. बसस्थानक ते आरोग्य शिबिर स्थळापर्यंत रूग्णांसाठी ऑटोची मोफत व्यवस्था व शिबिरस्थळी नास्ता, पाणी आदी व्यवस्था ठेवण्यात आली होती. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य शिबिर व येथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी शिबिरस्थळी आलेल्या ज्येष्ठ व दुर्धर आजारग्रस्त रूग्णांची आस्थेने विचारपूस केली. या आरोग्य संकल्प अभियानाच्या यशस्वीतेकरीता शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.