नागपूर :- सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला मिळवून दोतो, बँकेत चला, अशा थापा मारुन वयोवृद्ध महिलांचे पैसे व दागिणे लुटणाऱ्या महिलांच्या टोळीचा सध्या जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. यापैकी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिला हेच त्यांच्या रडारवर दिसून आले.
महिलांना लुटणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला अटक नुकतीच अटक करण्यात आली. त्यातून फसवणुकीची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहे. मात्र, अनेकजण त्यापासून वंचित असल्याने त्याचा लाभ मिळावा यासाठी ते प्रयत्नरत असल्याचे दिसून येतात.
अशा ज्येष्ठ नागरिकांना, खासकरून महिलांना हेरून त्यांना सरकारी योजनेतून लाभ मिळवून देण्याच्या नावाखालीच त्यांची फसवणूक केल्या जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या तीन घटनांमध्ये ७० ते ८५ वर्षांच्या वृद्ध महिलांना टारगेट करीत, त्यांना सरकारी योजनेतून पाच हजार रुपये महिना मिळवून देतो अशी बतावणी करीत त्यांच्याकडील दागिणे घेऊन महिला चोरटे पसार झाले आहेत.
यापैकी दोन घटना जुनी कामठी परिसरातच घडल्या असताना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. इतवारी दहिबाजार परिसरात भाजी खरेदीसाठी गेलेल्या वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिणे घेऊन ४५ वर्षीय महिला पसार झाली. ही घटना मंगळवारी (ता.२०) दुपारी साडेतीन ते पाच वाजताच्या सुमारास घडली.
तेजुबाई लहानुजी मोहाडीकर (वय ८५, रा. इतवारी) असे महिलेचे नाव आहे. त्यांना निराधार असल्याचे पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांना बॅंकेत घेऊन जात, काही पैसे लागतील असे सांगून त्यांच्याकडील गळ्यातले, कानातील १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली. दरम्यान सातत्याने होत घडत असलेल्या घटनेनंतर अद्यापही आरोपी महिलांना अटक झालेली नाही हे विशेष.
३० ते ४५ वयोगटातील महिला
शहरात वावरणाऱ्या या टोळीतील महिला साधारणतः ३० ते ४५ वर्ष वयोगटातील आहेत. विश्वास पटावा याकरिता त्या आधी लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये नेतात. त्यानंतर बँकेत घेऊन जातात. लाभासाठी काही पैसे भरावे लागेल असे सांगतात. ते नसेल तर दागिणे गहाण ठेवायला सांगितले जाते. ते परत करण्याचीही हमी दिली जाते. दागिणे घेतल्यानंतर त्या पुन्हा फिरकत नाहीत.
ऑटोमधून येतात महिला
गेल्या तीन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या या महिला ऑटोतून येतात. बाजार, रस्ता वा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी वृद्ध महिलांना हेरून त्यांना विश्वासात घेतात.