– रामटेक तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी
– रामटेक तालुक्यातील शेतक-यांना शेतीकरिता तात्काळ पेंच जलाशयातील पाण्याची उपलब्धता करावी
रामटेक :- गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. यानंतर शासनाच्या आदेशानुसार प्रशाषकीय यंत्रनेकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादरही करण्यात आलेला होता. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तेव्हा याचीच दखल घेत मनसे शेतकरी सेनेच्या एका शिष्टमंडळाने नुकतेच याबाबदचे एक निवेदन स्थानिक तहसिलदार हंसा मोहने यांना देत नुकसान भरपाई तथा शेतीसाठी पेंच जलाशयाचे पाणि सोडण्याबाबद मागणी केलेली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोंबर – नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. सदर लाभार्थी शेतक-यांची संख्या अंदाजे ४००० (चार हज़ार) असुन तीस ते पस्तीस हजार हेक्टर शेत पिकांचे नुकसान झालेले आहे. ही सर्व रक्कम जवळपास आठ ते नऊ कोटीवर असुन अद्यापपावेतो संबंधीत शेतक-यांना प्राप्त झालेले नाही. तर दुसरीकडे सध्या पावसाळा ऋतु सुरु असला तरी मात्र ज्याप्रमाणात पाऊस पडायला पाहीजे त्या प्रमाणात पडलेला नाही. तेव्हा पेंच जलाशयाचे पाणी सोडणे गरजेचे असल्याचे निवेदनानुसार शिष्टमंडळाने तहसिलदारांना सांगीतले. निवेदन देतेवेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदीले, रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे, माजी तालुका अध्यक्ष अनिल मुलमुले, रतन वासनीक, प्रफुल्ल पुसदेकर, राकेश चवरे, मयुर तलेगावकर, हर्ष ढगे, श्यामसुंदर नवघरे, मुकेश भोंडेकर, अतुल गजभिये, अमीत बादुले, श्रावण सरोते आदी. उपस्थित होते.
बँकेतून कर्जही सहसा मिळेना – सुरेश वांदिले
शेतीचा नविन हंगाम सुरू झालेला असला तरी मात्र पिक उभं करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर रुपड्यांची बंडले खर्च करावी लागेल. मात्र सध्यास्थितीत शेतकरी आर्थीक संकटामध्ये सापडलेला आहे. उपाय म्हणुन कर्ज मिळण्याकरिता बँकेत गेले तर तेथे सुद्धा ब-याच अडचणी असतात. त्यामुळे शेती करावी तरी कशी हा मोठा बिकट प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासुन उभा ठाकलेला असल्याचे मत यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदिले यांनी व्यक्त केले.
अहवाल मंजुर, येत्या एक दोन महिन्यातच पैसे मिळणार – नायब तहसीलदार बडवाईक
याबाबद रामटेक तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार भोजराज बडवाईक यांना विचारणा केली असता ‘अतीवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या एकुन शेतकऱ्यांची संख्या ४१३३ आहे. ३० जुन पुर्वीच आम्ही पिडीत शेतकऱ्यांची यादी अपलोड करून शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. तो अहवाल शासनाकडुन मंजुर झालेला असुन लवकर व्ही.के. नंबरची यादी शासनाकडून येईल. ती ग्रामपंचायत स्तरावर प्रकाशित केल्या जाईल. त्यावरील व्ही.के. नंबर घेऊन शेतकऱ्यांना आधार केंद्र किंवा सेतु केंद्रावर जावे लागेल व तिथे थंब लावावा लागेल. आधार मॅच होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. म्हणजेच येत्या एक – दोन महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळणार असल्याचे नायब तहसिलदार भोजराज बडवाईक यांनी माहीती देतांना सांगीतले.