– पोलीस आयुक्तांनी साधला मनपा संजय नगर शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद
नागपूर :- विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. समाजात कुठेही चुकीची घटना घडत असेल, समाजात कुठेही गुन्हा घडत असेल तर पोलिसांना न घाबरता सर्व माहिती द्या, असा सल्ला नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना दिला. बुधवारी (ता.१०) पोलीस आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेच्या डिप्टी सिग्नल येथील संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पोलीस आयुक्तांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता एक तास राखून ठेवला होता. शाळेच्या विद्यार्थ्यांशी हितगूज करत त्यांना निर्भिड राहण्याच्या सूचना केल्या व आपण छोटा पोलीस आहात असे सांगितले. समाजात कुठेही गुन्हा घडत असेल किंवा कोणत्याही व्यक्ती सोबत अनुचित प्रकार घडत असेल तर पोलिसांना न घाबरता सर्व माहिती देण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला. यामुळे येणाऱ्या काळात आपण मोठा अनर्थ टाळू शकतो, पोलिसांना घाबरण्याचे काही कारण नाही माझे पोलीस तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत, हे देखील समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने मन लावून शिक्षण घेतले पाहिजे. यश मिळविण्यासाठी कोणतेही ‘शॉर्टकट’ नाही. सतत मेहनत करून यशाची प्राप्ती होते, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कळमना पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक तसेच आर.एस.पी. चे अधिकारी यांच्या समवेत शाळेमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री गोहोकर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मधु पराड यांनी केले. पोलीस आयुक्तांचा जीवन परिचय डॉ. मीनाक्षी भोयर यांनी सांगितला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.