Ø राजधानीतील संमेलनाने मराठी देशभर पोहोचेल
Ø दिल्ली संमेलनानिमित्त कवी, साहित्यिकांशी संवाद
यवतमाळ :- राज्य शासनाच्या प्रयत्नाने केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत होत आहे. तमाम मराठी बोलणाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मराठीला दर्जा प्राप्त झाल्याने संपुर्ण भारतात आमची मायबोली पोहोचेल, अशी भावना यवतमाळ येथील कवी, साहित्यिकांनी व्यक्त केली.
माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन, असे संत ज्ञानेश्वर मराठीच्या बाबतीत म्हणाले होते. कवी नरेंद्र यांनी सहा भाषेचा रस एकट्या मराठी भाषेत असल्याचे मराठीची महती सांगतांना म्हटले आहे. प्राचिन काळापासून आतापर्यंत जगाच्या पाठीवर जितक्या मोठ्या भाषा आहे, त्या भाषांच्या बरोबरीने सोप्या भाषेत वाङमय लिहिल्या गेलेली मराठी भाषा आहे. ज्या भाषेत दर्जेदार, महनिय, गहनिय असे वाङमय लिहिल्या जाते ती भाषा अभिजात नाही, असे म्हणवले जात नाही. आता तर अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या सर्वांची छाती फुगली आणि मान उंचावल्या गेली आहे, असे जेष्ठ कवी विनय मिरासे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. विविध जाती जमातींच्या विविध भाषा आहे. परंतू जोपर्यंत कोणतीही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा होणार नाही, तोपर्यंत ती भाषा मोठी होऊ शकणार नाही. मराठी भाषेत विज्ञान, तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. वऱ्हाडी, अहिराणी भाषा देखील मराठीने स्विकारून भाषा अजून समृद्ध होणे आवश्यक आहे, असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा.माधव सरकुंडे यांनी व्यक्त केले.
अभिजात दर्जा देऊन शासनाने मराठी भाषकाला न्याय दिला. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्ली येथे होत आहे. त्यामुळे मराठी देशभर पोहोचेल. मराठी भाषकांचा सर्व व्यवहार मराठीतून झाला पाहिजे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कार्पोरेट व्यवहार देखील मराठीत झाले तर भाषा अजून समृद्ध होईल, असे मत प्रा.घनश्याम दरणे यांनी व्यक्त केले.
पुर्वाश्रमीच्या सारस्वतांना मराठी ‘राजभाषा’ नसल्याची खंत असायची. मराठी भाषकांच्या मनात देखील अशी खंत होती. मराठी प्राचिन आणि निकष पुर्ण करणारी भाषा आहे. अखेर ती अभिजात दर्जाला प्राप्त झाली. याप्रयत्नांसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानतो. अभिजात दर्जामुळे मराठी भाषेचे सौंदर्य सर्व भाषिकांना पाहायला मिळणार आहे. मराठी भाषेत संत वाङमय, शाहिरी वाङमयाने भर टाकली. नंतरच्या काळात अनेक साहित्यिकांनी त्यात आधुनिकता आणली, असे मराठी भाषेचे अभ्यासक डॅा.सतपाल सोहळे यांनी सांगितले.