संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजच्या धावपळीच्या जीवनात कुणाला कोणत्या रोगाचे निमंत्रण मिळणार याचा काही नेम उरलेला नाही तेव्हा अचानक घरात कुणाची प्रकृती गंभीर झाल्यास त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात व रुग्णालयाचे बिल देताना बहुधा कर्जबाजारी व्हावे लागते तर कधीकाळी नाईलाजास्तव दागिने विकावे लागतात याला एकच कारण आहे ते म्हणजे शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती नसणे. वास्तविकता त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ घेता येऊ पण योजनेची माहिती नसल्याने कर्जबाजारीची स्थिती उदभवते. तर आरोग्य विषयक योजनांच्या महितीपासून सामान्य जनता अजूनही अनभिज्ञ आहे ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही 1 जून 2017 पासून नाव बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना करण्यात आले आहे. या आरोग्य योजने मार्फत जाणाऱ्या रुग्णाला या योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया,औषधे,जेवण व प्रवास खर्च दिला जातो.971 प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया खाजगी व शासकीय रुग्णालयात मोफत होतात .
971 प्रकारच्या या आजार व उपचार योजने अंतर्गत (कॅन्सर,हृदयाची बायपास शस्त्रक्रिया,एन्जोप्लास्टी,मणक्याचा आजार,हाडांची शस्त्रक्रिया,डोळ्यांचा आजार, प्लास्टिक सर्जरी,पित्त, पिशवीची शस्त्रक्रिया,ब्रेन ट्युमर,भाजणे, गुडद्यांची शस्त्रक्रिया,एपेंडिक्स,हर्निया,गर्भपिशवीची शस्त्रक्रिया, हृदयाला वाल बसवणे, हृदयाला पेसमेकर बसवणे,पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया तसेच नाक,कान, घश्याची शस्त्रक्रिया इत्यादी सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येतो.या योजनेची माहिती नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून सर्रास आर्थिक लूट केली जाते त्यामुळे अनेकांचे संसार आर्थिक परीस्थितीमुळे उध्वस्त होतात मात्र या योजनेमुळे या आर्थिक लुटीला आळा बसला आहे त्यामुळे सामान्य जनतेला आरोग्य विषयक माहिती होणे गरजेचे आहे.
@ फाईल फोटो