लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलेली माहिती
नवी दिल्ली– पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गांना स्वीकृती मिळाली आहे. 1.46 लाख किमीचे महामार्ग गती शक्ती योजनेत आता 2 लाख किमीपर्यंत बांधले जाणार आहेत, अशी माहिती रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली.
खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. गती शक्ती योजनेत नवीन महामार्गांच्या बांधकामांनाही मान्यता मिळाली आहे. गतिशक्ती योजनेला मालवाहतुकीच्या दृष्टीनेही जोडण्यात आले आहे. मालवाहतुकीचा खर्च कमीत कमी व्हावा या दृष्टीने वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. वाहतुकीत होणारा प्रचंड खर्च कमी करण्याच्या दृष्टीने यात प्रयत्न करण्यात येत आहेत.
उत्तराखंड, उत्तर-पूर्व भारत, काश्मीर येथेही महामार्गाची कामे जोरात सुरु आहेत. उत्तर पूर्व भारतात 2 लाख कोटींच्या योजनांची, तर काश्मीरमध्ये 1 लाख कोटींच्या योजनांची कामे सुरु आहेत. हे सर्व महामार्ग युरोपियन देशातील महामार्गांच्या दर्जाचे राहणार आहेत, असेही ना. गडकरी म्हणाले.
बुध्दसर्किटअंतर्गत 20 हजार कोटींचे महामार्गभगवान गौतम बुध्दांचा जन्म, साधना, महापरिनिर्वाण व त्यांच्या जीवनाशी संबंधित सर्व शहरांना महामार्गाने जोडण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 20 हजार कोटींचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. बोधगया, राची, नालंदा, बिहारशरीफ येथे जोडणारे 4 पदरी महामार्गाची कामे सुरु आहेत. बख्तियारपूर, पाटणा येथेही बुध्दसर्किट अंतर्गत महामार्गाची कामे सुरु आहेत. नुकतेच कुशीनगर व वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. याशिवाय या भागातील खासदारांनी केलेल्या मागण्या सर्वोच्य प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. इंडोनेशिया, जपान, मलेशिया, चीन आदी देशातील येणारे प्रवासी-भाविकांसाठी महामार्गांचे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले.