लातूर, सोलापूर जिल्ह्यांच्या सकारात्मक कामांचा ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली :- लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना शुक्रवारी ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज विज्ञान भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 16 व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. यामध्ये राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत लातूर जिल्ह्यात विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी हे प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वीकारतील.

सोलापूर जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन परिर्वतन’ वर्ष 2021-22 मध्ये राबविण्यात आले होते. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा घालण्याकरीता व त्याचे समूळ उच्चाटनासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमास पोलीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. त्यांच्या या कार्याची दखल घेत उद्या प्रधानमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल. हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वीकारणार आहेत.

राज्याला एकूण 6 वेळा ‘नागरी सेवा दिनी’ गौरविण्यात आले

यापूर्वी 2011 ला राज्यातील नवी मुंबई महानगर पालिकेच्या ई.टी.सी. दिव्यांग शिक्षण व प्रशिक्षण उप‍क्रमाला पुरस्कार मिळालेला आहे. याचवर्षी सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर पंचायतीला चोवीस तास व्यक्तिगत मीटरव्दारे पाणी पुरविण्याच्या योजनेलाही पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनतर 2015 ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘जिल्हा कौशल्य विकास’ या उपक्रमास राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘पीक व कीटक देखरेख आणि सल्लागार प्रकल्पास’ (CROPSAP) संस्थात्मक श्रेणीतून पुरस्कृत करण्यात आले होते. वर्ष 2017 व 2018 मध्ये प्रधानमंत्री ‘पीक विमा योजने’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनुक्रमे जालना आणि बीड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

मूळ महाराष्ट्रातील मात्र अन्य राज्यातील कॅडर मिळालेले प्रशासकीय अधिकारी किरण गित्ते, अजित जोशी यांना ही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कांमासाठी ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे - चंद्रकांत पाटील

Fri Apr 21 , 2023
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने दिनांक १९ व २० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्या अनुषंगाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com