नागपूर : शहरातील सीताबर्डी स्थित ‘गेटवे रिगल थिएटर’ या ऐतिसिक वास्तूचे संवर्धन केले जाणार आहे. शुक्रवारी (ता.३) मनपा मुख्यालयात झालेल्या हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात पार पडलेल्या बैठकीत समिती प्रमुख अशोक मोखा, समिती सचिव तथा उपसंचालक नगररचना विभाग प्रमोद गावंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रपाठक डॉ. शुभा जोहरी आदी उपस्थित होते.
गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट प्रा. लिमिटेड यांनी ‘गेटवे रिगल थिएटर’ या हेरिटेज वास्तूचे संवर्धन आणि दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली होती. तसेच हेरिटेज समितीने या ऐतिहासिक वास्तूच्या दोन्ही बाजूला ५० मीटर नो हॉकर्स झोन सुद्धा घोषित करण्याकरीता कार्यवाही करण्याचे निर्देश धरमपेठ झोनला दिले आहेत.
गोयल गंगा तर्फे प्राप्त विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. शासन मान्य सूचीनुसार सीताबर्डी येथील ‘गेटवे रिगल थिएटर’ या नावाने हे स्थळ असून ग्रेड-१ चे स्थळ आहेत. याची मलिकी खाजगी असून ही जागा बुटी परिवाराची आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आवश्यक असून त्याचे संवर्धन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.