जनसंवाद रथ यात्रेचे कामठी विधानसभा क्षेत्रात जल्लोषात स्वागत
‘महायुती’ कार्याकर्त्यांनी केला गावा-गावात ‘धनुष्य-बाणा’चा प्रचार
कामठी :- जाती-धर्मातील भेदाभेद नष्ट करून अठराव्या शतकात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी केले. महात्मा फुलेंच्या वारसा समोर नेण्यासाठी प्रत्येकांमध्ये वाचनसंस्कृतीची ज्योत पेटविण्यासाठी ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविण्याचा आपला मानस असल्याची ग्वाही महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निवडणूक क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी व्यक्त केले. कामठी विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद रथ यात्रेची सुरुवात गुरुवारी मौदा येथून प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
जनसंवाद रथ प्रचार यात्रेत कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजप नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारेसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलतांना राजू पारवे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचनाची प्रगल्भता वाढविल्यानंतरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे दारे मोकळी होणार. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करणे सोपे जाणार. याकरिता ‘गाव तेथे ग्रंथालय’असण्याची आज गरज आहे. या माध्यमातून कमी लोकसंख्या असलेल्या गावातही ग्रंथालय उभारणे आज गरजेचे आहे. याशिवाय आदिवासी दुर्गम पाड्यांवरही विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही राजू पारवे यावेळी म्हणाले.
फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या 198 व्या जयंती आज गावागावात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यांनी बालविवाहावर निर्बंध घालून विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. ज्यावेळेस बहुजन समाज दारिद्र आणि अज्ञानात खितपत पडलेला होता. शिक्षण मुठभर लोकांनाच घेण्याचा अधिकार होता. अश्यावेळी फुले दाम्पत्यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ग्वाही यावेळी राजू पारवे यांनी दिली.
पहिली पंसती ‘धनुष्य-बाणा’ला द्या
गेल्या बारा दिवसांपासून मी जनसंवाद रथ यात्रेतून प्रत्येक ग्रामवासींयाची भेट घेत आहे. गावातील महिला, पुरुष, तरुण भर उन्हात माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असताना मला दिसून येत आहेत. कुणी रांगोळी काढली तर कुणी पुष्पवर्षाव करत आहेत. गावात स्वागताचे औषण हेच आपण दिलेल्या आशिर्वादाची पावती आहे, त्यामुळे मी भारावलो आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या कामठी विधानसभेतील मुलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मला आपली साथ लागणार आहे. रामटेकवासीय नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे. येणाऱ्या 19 तारखेला आपण पहिली पसंती धनुष्य-बाण चिन्हाच बटन दाबून विजयाचा झेंडा फडकावा अशी मी आशा बाळगतो असेही राजू पारवे यावेळी केले.
मौदा, धामनगाव, मोहाळी, बोरगाव, धानला गावात पदयात्रेतला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौदा, लापका, धामनगाव, आजनगाव, मांगली तेली, इंदोरा, धर्मापुरी, खात, घोटमुंढरी, दहेगाव, भोवरी, चिखलाबोडी, निहारवाणी, गोवरी, मोहाळी, बोरगाव, धानला, नवेगाव मारोडी, चिरव्हा या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद रथ यात्रेचा कामठी विधानसभा क्षेत्रातील चिरव्हा गावात रात्री झालेल्या भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाला. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने जनसंवाद रथ यात्रेची रंगत वाढवली. प्रचार रथाचे सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.