नागपूर :- लोकसभा निवडणुकीत नागपुरातील अनेक मतदारांना विविध तांत्रिक कारणांमुळे मतदान करता आले नव्हते. अनेकांची नावे यादीतून गहाळ झाली होती. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानाच्या टक्केवारीवरही झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा प्रकार होऊ नये, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे ज्या नागरिकांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागले, त्यांनी येत्या २० ऑगस्टच्या आत अवश्य मतदार नोंदणी करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री म्हणून आपण हे आवाहन करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २० ऑगस्ट 2024 पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली नोंदणी करताना इतरांनाही याबाबत आठवण करून द्यावी, असेही ना. गडकरी यांनी म्हटले आहे.
१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची नावे सुटली असतील किंवा जे लोकसभा निवडणुकीत मतदानाला मुकले असतील अशांनी नोंदणी करावी. तसेच ज्यांना मतदार ओळखपत्र असूनही मतदान करता आले नाही, अशांनी फॉर्म क्रमांक सहा भरून नोंदणी करून घ्यावी. मतदान केंद्रांवर सुद्धा फॉर्म नं. 6 ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा लाभ सर्व मतदारांनी घ्यावा, असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले आहे.
इथे करा नोंदणी
नागरिकांना प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करता येईल. याशिवाय लोकप्रतिनिधींनी स्थापन केलेल्या मतदार नोंदणी केंद्रांवरही ही व्यवस्था आहे. सोबतच घरबसल्या ऑनलाईन देखील नोंदणी करता येणार आहे.