मनपा आयुक्तांद्वारे आदेश निर्गमित : २ मार्चपर्यंत एकतर्फी वाहतुकीचे नियोजन
नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २७ मधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन टी-पॉईंट रोड पर्यंत मुख्य गडरलाईनचे काम प्रस्तावित असल्याने या कामासाठी या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.२) आदेश निर्गमित केले.
साउथ सिवरेज प्रकल्पांतर्गत नेहरूनगर झोनमधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन टी-पॉईंट रोडवरील मुख्य गडरलाईनच्या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूकडील रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. नमूद रस्त्यावरील वाहतूक डाव्या बाजूने किंवा इतर अन्य अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यासंदर्भातही मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. २ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान सदर आदेश अंमलात राहणार आहे.
सदर मार्गावर काम सुरू असताना संबंधित कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत आयुक्तांनी आदेशित केले आहे. कामाच्या ठिकाणी काम सुरू केल्याची व काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दिनांक, कंत्राटदराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याचे फलक लावणे, पर्यायी मार्ग सुरू होत असलेल्या दोन्ही टोकावर तसेच बॅरिकेट्स जवळ रोडवर कंत्राटदाराने आपले सुरक्षा रक्षक नेमणे, वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाट्या, कोन्स, बॅरिकेट्स दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स एल.ई.डी., बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करणे, काम सुरू झाल्यानंतर जमिनीतून निघणारे मटेरियल्समुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होउ नये यासाठी ते रस्त्यावर न टाकता त्यासाठी विशेष व्यवस्था करणे, कामादरम्यान पर्यायी मार्गावर निर्माण होणारे खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण, डांबरीकरण करून रोड पूर्ववत करणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या दोन्ही टोकांवर लोकांच्या लगेच निदर्शनास येईल अशा स्वरूपात वळण मार्गाचे फलक लावणे, रात्रीचे वेळी वाहनचालकांच्या माहितीकरिता एईडी डायव्हर्सन बोर्ड, बॅरिकेटिंगवर एलईडी माळ लावणे, उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक चालणार असल्याने त्या ठिकाणी अस्थायी रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक वळविणे, वाहतूक पोलिसांच्या दिशानिर्देशांचे पालन करणे, रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून देणे आदी सर्व नियमावलीचे कामाच्या ठिकाणी पालन होणे आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.