नागपूर :- फुटाळा तलाव येथे मागील वर्षी संगीतमय कारंजाची उत्कृष्ट सुरुवात करण्यात आली. परंतु येथे कॉमेंट्री द्वारे नागपूर शहराची ऐतिहासिक माहिती दिल्या जाते त्या माहितीत अनेक चुका असल्याने ती दुरुस्त करण्याची तक्रार जिल्हाधिकारी,, एन एम आर डी ए (एन आय टी) चे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, सांस्कृतिक महोत्सव समितीचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे मागील वर्षी 27 सप्टेंबर 22 रोजी लेखी केल्यावरही आजपर्यंत त्यावर सुनावणी झाली नाही. अशी माहिती बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.
आजच एन एम आर डी ए चे महानगर आयुक्त मनोज सूर्यवंशी यांनी नोव्हेंबर मध्ये या संगीतमय कारंजाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती दिली. संगीतमय कारंजाच्या माध्यमातून नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतःची पाठ थोपटत आहेत. परंतु त्या संगीतमय कारंजाच्या कॉमेंट्री मध्ये नागवंशीय नागपूरकरांचा अपमान, नागपूर महानगर बसविणाऱ्या बक्त बुलंदशहा, आदिवासिंचा, 1956 ला दीक्षा घेतलेल्या बौद्धांचा अपमान तसेच मनुवादी महापुरुषांचा सन्मान व बहुजन महापुरुषांचा अवमान होईल अशा प्रकारची माहिती आहे. जोपर्यंत कॉमेंट्री मधील दुरुस्ती केल्या जाणार नाही, तोपर्यंत हा शो सुरु केल्या जाऊ नये अन्यथा बसपा महापुरुषांच्या सन्मानासाठी संबंधितांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करेल अशी धमकी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी दिली आहे.