-मनपा आयुक्तांचे आदेश जारी : शहर क्षेत्रात एकूण १०६९ शाळा
नागपूर, ता. १५ : नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा १ डिसेंबर २०२१पासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता गुरूवार १६ डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.१५) आदेश जारी केले आहेत.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या ११६ शाळांसह १०५३ खासगी शाळा अशा एकूण १०६९ शाळा गुरूवारी (ता.१६) सुरू होतील. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या १०६९ प्राथमिक शाळांमध्ये एकूण २ लाख ४९ हजार ७१५ विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये ९३१९ विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये २ लाख ४० हजार ३९६ एवढी विद्यार्थी संख्य आहे. प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पालन करण्याबाबत आवश्यक उपाययोजनना आखण्याचे निर्देशही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशाद्वारे दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले होते. मात्र शहरातील कोव्हिड संसर्गाचा धोका लक्षात घेता मनपाद्वारे इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याला १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आलेली होती. त्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत आदेश मनपा आयुक्तांनी जारी केले आहे. शाळा सुरू करताना शाळांनी मनपाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी, शिक्षक व अन्य कर्मचा-यांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायजरचा वापर करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे सक्तीचे नसून पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे.
नागपूर शहरातील शाळा सुरू करताना शाळेमध्ये वर्गात किंवा अन्य परिसरात दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, प्रत्येकाने फेस मास्क/फेस कव्हर वापरणे बंधनकारक, वारंवार हात धुणे आवश्यक करण्यात आले आहे. वर्गामध्ये विद्यार्थीसंख्या जास्त असल्यास दोन पाळीमध्ये शाळा घेणे, एका बाकावर एक विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था करणे, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर असावे, एका वर्गात १५ ते २० विद्यार्थी असावेत अशी व्यवस्था करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोजचे कोव्हिड लसीकरण आवश्यक आहे. शिंकताना, खोकताना स्वत:चे तोंड व नाक हात रूमाल टिश्यू पेपर अथवा दुमडलेल्या हाताच्या कोपराने झाकावे. वापरलेल्या टिश्यू पेपरची विल्हेवाट आरोग्यदायी रितीने लावण्यात यावी. प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे स्वत: बारकाईने निरीक्षण करावे आणि कोणतीही लक्षणे किंवा आजार असल्यास वेळेत त्याची माहिती द्यावी व उपचार करून घ्यावे.
शाळा उघड्यापूर्वी करा नियोजन
शाळा उघडण्यापूर्वी शाळा प्रशासनाद्वारे आवश्यक नियोजन करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळा अजूनही कन्टेन्मेट झोनमध्ये आहे त्या उघडू नये. तसेच जे विद्यार्थी, शिक्षक कन्टेन्मेट झोन क्षेत्रात राहतात त्यांना शाळेत येण्याची अनुमती देऊ नये. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी कन्टेन्मेट झोन क्षेत्रात भेट देऊ नये. अशा सूचना शाळेमार्फत देण्यात याव्यात. पूर्ण शाळेची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात यावी. ज्या पृष्ठभागांना वारंवार स्पर्श होतो असे पृष्ठ भाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने पुसून घ्यावेत. ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आलेल्या आहेत. त्यांची स्वच्छता विशेष लक्षपूर्वक करण्यात यावी. कोव्हिड-१९ चा प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमॅट्रिक उपस्थिती पद्धत टाळण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन खुणा करण्यात याव्यात. मैदानावर, प्रार्थनास्थळी मुलांनी रांगेत व्यवस्थित रहावे यासाठी शारिरीक अंतराचा विषय लक्षात घेऊन खुणा करण्यात याव्यात. हिच पद्धत स्टाफ रूम, ग्रंथालये आदी ठिकाणी सुद्धा वापरण्यात यावी. शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामुहित प्रार्थना टाळावेत. शाळेतील जिमनॅशिय वापरताना देखील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. जलतरण तलाव वापरू नये. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिजोखमीचे आजार आहेत किंवा ज्या महिला कर्मचारी, शिक्षिका गरोदर आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायजर, एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.
याशिवाय शाळा सुरू झाल्यानंतर ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्ती जसे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आदींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्याची अनुमती देण्यात यावी. शाळेमध्ये दर्शनी भागात कोव्हिड प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे. मुले ज्या स्कूल बस, वाहनाने शाळेला येतात त्या वाहनांमध्ये मुलांची गर्दी असू नये. आवश्यकतेनुसार अशा वाहनांचे सुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेला येताना किंवा शाळा सुटल्यानंतर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन कोव्हिड नियमांचा भंग करू नये, यासाठी मुलांना सावध करण्यात यावे, मुले किंवा शिक्षक आजारी असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.
विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास घ्यावयाची काळजी
वर्गात एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास शाळांद्वारे करावयाची कृतीयोजना सुद्धा मनपाद्वारे नमूद करण्यात आली आहे. बाधित विद्यार्थी ज्या रांगेत बसतो त्याच्या मागील, पुढील आणि दोन्ही बाजुच्या रांगेतील तीन विद्यार्थी आणि त्यासह शिक्षकांची यादी करावी. निकट सहवासित विद्यार्थ्यांना दोन आठवड्यांकरिता होम क्वारंटाईन करावे. या काळात ज्यांना कोव्हिडसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ५ ते १० दिवसांमध्ये कोव्हिड चाचणी करून घ्यावी. बाधित व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांवर त्यांच्या लक्षणाप्रमाणे वैद्यकीय विलगीकरणात उपचार करण्यात यावेत. अतिजोखमीचे आजार असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी. बाधित विद्यार्थी आढळलेल्या वर्गखोलीतील बाके निर्जंतुक करून घेण्यात यावी. क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात यावी.
शाळा सुरू करण्यापूर्वी उपरोक्त सर्व मुद्द्यांची पूर्तता झाली असल्याबाबत अहवाल प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नागपूर व मनपा शिक्षणाधिकारी यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त यांना सादर करणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहिल, असेही आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.