नागपूर :- सततची नापिकी.. पावसाची अनियमितता.. अवेळी मिळणारी वीज… एक ना अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट खते असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनात मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकतो. त्याचा प्रत्यय नागपूर जिल्ह्यातील खापा तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकरी किरण बावरिया यांना महावितरणच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे आला आहे.
सौर उर्जेची साथ मिळाल्यामुळे वीजेची अनियमितता, वीज कपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यामुळे बाधित होणारे सिंचन आता अविरत सुरू राहणार आहे. सुमारे 2.25 एकर कोरडवाहू शेती असल्यने सिंचनाशिवाय पर्याय नव्हता, त्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यात फेब्रुवारी 2024 मध्ये किरण बावरिया यांच्या शेतात महावितरणच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत कृषीपंप लागला. यामुळे त्यांना सिंचनासाठी पाण्याचा योग्य प्रवाहासोबतच दिवसा वीज मिळत असल्याने सिंचन करणे अगदी सहज झाले असून वीज बिलाची देखिल चिंता संपली असल्याची माहिती किरण बावरिया यांनी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना, देवेंद्र फ़डणविस यांनी या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकताच संवाद साधला त्यावेळी दिली. लाभार्थी शेतकरी किरण बावरिया यांनी या योजनेबद्दल समाधानी असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला.
या योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी अर्ज करताच तातडीने पंप मिळाला. आधी अंधारात सिंचनासाठी जातांना सरपटणा-या प्राण्यांची, श्वापदांची सारखी भीती असायची मात्र सौर कृषीपंपामुळे आता दिवसा वीज मिळत असल्याने अंधारात सिंचनासाठी शेतात जायची नसून वीजेमुळे होणा-या अपघाताची शक्यता देखील नाहिसी झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की हा पंप मिळायच्या आधी सिंचनासाठी डिझेलवर चालणा-या पंपाचा वापर करावा लागत होता, त्याचा खर्च झेपत नव्हतं. मात्र आता डिझेलचा खर्च मिटला, वीज बिलाची चिंता नाहिसी झाली, वीज उपलब्धततेची काळजी नाहिसी झाली असून आता आपण भाजीपाल्याचे नियमित पिक घेत असल्याचेही किरण बावरिया यांनी सांगितले.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे सामान्य शेतकऱ्यांना 90 टक्के तर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीमधील शेतक-यांना 95 तक्के सबसिडी सह तात्काळ सौर कृषी पंप मिळत आहेत. सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होत आहे. सौर पॅनेल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ वीजबिल येणार नाही. साडेसात एचपी पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत. याशिवाय या पंपावर 5 वर्षाची गॅरंटी असून 25 वर्ष विमा संरक्षण देखील असल्याने ही योजना राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक असून शेतक-यांना पर्यावरणपूरक हरित ऊर्जा देणारी आणि अनुदान आणि क्रॉस सबसिडीचे पैसे वाचविणारी असल्याने महावितरनची ही योजना शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग ठरणार आहे.