नागपूर :- नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंची घटनांची नोंदणी आता या दोन्ही रुग्णालयांमध्येच केली जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशासनाला पत्राद्वारे आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, येत्या १ जून २०२३ पासून शहरातील मेडिकल आणि मेयो मध्ये होणारे जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद तेथेच ऑनलाईन माध्यमातून केली जाईल. तर मनपा रुग्णालयांसह नागपूर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये होणारे जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी नागपूर महानगरपालिकेच्या संबंधीत झोन मध्ये केली जाणार आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या आरोग्य संस्थांची इमारत अथवा इमारतीच्या आवारात घडलेल्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करणे अपेक्षित असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित आरोग्य संस्थांनी जन्म मृत्यूची घटनांची नोंदणी करणे व त्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करणे अनिवार्य आहे. यासंदर्भात शहरातील मेडिकल आणि मेयो प्रशासनाद्वारे सदर ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून त्यांच्या रुग्णालयांमध्ये जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी सुरू झाल्याबाबतचा अहवाल ८ दिवसांच्या आत उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजीआ) पुणे तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू कार्यालयास सादर करण्याचेही त्यांनी निर्देशित केले आहे.
1 जुन पासून मेडिकल आणि मेयो मध्ये जन्म, मृत्यू नोंदणी होणार व तिथेच प्रमाणपत्र मिळणार, मनपा व खासगी रुग्णालयांशी संबंधित नोंदणी मनपामध्येच
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com