नागपूर :- राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या विविध योजनांसाठी अर्ज सादर करता यावे, याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे ३ मे ते १५ जून यादरम्यान ‘जत्रा शासकीय योजनांची – सामान्यांच्या विकासाची’ अभियान २०२३ राबविण्यात येत आहे. राज्य शासनाकडून प्राप्त् मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शहरात दहाही झोनमध्ये अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात विविध विभागांचे अधिकारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत. सदर योजना मनपाच्या दहाही झोन अंतर्गत राबविण्यात यावी तसेच मनपा हद्दीत येणाऱ्या खाजगी व शासकीय शाळांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार ३ मे ते १५ जून २०२३ या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन कार्यालयामध्ये दर बुधवार आणि गुरूवारी ‘जत्रा शासकीय योजनांची – सामान्यांच्या विकासाची’ अभियान अंतर्गत शिबिर घेण्यात येणार आहे.
अभियान येत्या १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असून, अभियानातंर्गत समाज विकास विभाग, आरोग्य विभागाच्या योजनासह इतर विभागाच्या योजनांचाही लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. यात विविध दाखले / प्रमाणपत्र देणे / आधार नोंदणी करणे, अद्ययावत करणे इ. सोयी सुविधा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.