– पशुवैद्यकीय विभागाच्या मदतीने ओलावा पशुप्रेमी फाऊंडेशनचा पुढाकार
यवतमाळ :- येथील ओलावा संस्था आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १९ जून रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या चौथ्या मोहिमेची सुरूवात शहरात झाली. पहिल्याच दिवशी ४९ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व मोकाट श्वानांना रेबित प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे.
ओलावा पशुप्रेमी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आलोक गुप्ता, पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त विजय राहाटे, सुरेश राठी, दीपक बागडी, डॉ. माया गायकवाड, सुमेध कापसे, नकुल कापसे, कार्तिक चौधरी, श्रेयस गुल्हाने, आशय नंदनवार, शशिकांत पकाले आदींच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. पशुवैद्यक विभागाचे पशु सहाय्यक आयुक्त डॉ. राजेंद्र अलोणे, आशिष रवेकर यांनी प्रत्यक्ष लसीकरण करून मोहीमेला सुरुवात केली.
ओलावा पशुप्रेमी फाऊंडेशन मोकाट पशूंच्या आरोग्यासाठी गेल्या चार वर्षांपासून अहोरात्र झटत आहे. ओलावा पशुप्रेमी फाऊंडेशन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवून मोकाट श्वानांना सुरक्षित करुन घेते. याचे सकारात्मक परिणाम देखील बघायला मिळत आहेत. शहरातील मोकाट श्वानांच्या गळ्यात अंधारात चमकणारे रेडियमचे पट्टे लावण्याचे कामही ओलावा फाऊंडेशनने हाती घेतले असून पट्टे संपेपर्यंत ते सुरू राहील, अशी माहिती ओलावा पशुप्रेमी फाऊंडेशनचे सचिव सुमेध कापसे यांनी यावेळी दिली. या मोहिमेचे पशुवैद्यकीय विभागानेही कौतुक केले आहे.