संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : समाजकार्य महाविद्यालय कामठी व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन(इश्यू )संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात असलेल्या आजीविका संवर्धन परियोजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून न्यू तोतलाडोह ग्राम वळंबा, तालुका रामटेक या आदिवासीबहुल भागातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिली ते बारावीच्या एकूण ७६ शालेय विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते नोटबुक्स, वह्या, कंपासपेटी, चित्रकला वह्या, पेन, पेन्सिल, पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्याचे नि:शुल्क वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रुबीना अन्सारी होत्या, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या शांताताई कुमरे, अनिता घोडके, पोलीस उपनिरीक्षक देवलापार, डेकाटे मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा,वळांबा,ग्रामपंचायत सदस्या संगीता तुमडाम,प्रकल्प समन्वयक राजीव थोरात,आयक्यूएसई समन्वयक डॉ. निशांत माटे, सामाजिक कार्यकर्ते विनोद गजभिये,डॉ. ओमप्रकाश कश्यप यांची उपस्थिती लाभली होती.
सर्वप्रथम राजीव थोरात यांनी प्रास्ताविकातून आजीविका संवर्धन परियोजनेची माहिती दिली व गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यामागची भूमिका विशद केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती शांताताई कुमरे म्हणाल्या, शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे शिक्षणामुळेच माणूस घडतो आणि मुलांवर मानवी मूल्यांचे संस्कार होतात. त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास सोडू नये. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे विचार व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक अनिता घोडके मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, शिक्षणामुळे मुलांमध्ये देशप्रेम निर्माण होते. देशाप्रती आपली कर्तव्ये व भूमिका कशी असावी याचे ज्ञान शिक्षणातून होते. त्यामुळे शिक्षण हे केवळ विद्यार्थ्यांच्या आत्मोद्धाराचाच मार्ग नाही तो राष्ट्रनिर्माणाचा सर्वांत मोठा राजमार्ग आहे, हे त्यांनी मुलांना समजावून सांगितले. मुख्याध्यापक डेकाटे यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन ते शिक्षणास प्रेरित होतील अशी आशा व्यक्त केली व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्यामुळे समाजकार्य महाविद्यालय व इश्यू संस्थेविषयी आभार व्यक्त केले. समन्वयक डॉ. निशांत माटे म्हणाले, मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासाबरोबर त्यांचा शैक्षणिक विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या शैक्षणिक विकासामुळे ते स्वतः व स्वतःच्या परिवाराबरोबर संपूर्ण गावाचा विकास साधू शकतील. गावातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्य करावे. समाजहितासाठी आणि देशहितासाठी आपले योगदान द्यावे. आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून जगापुढे आणण्यासाठी शिक्षणात सदैव अग्रेसर राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. रूबीना अन्सारी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाल्या, गावातील मुलींनी आमच्यासारख्या उच्चशिक्षित स्त्रियांचा आदर्श स्वीकारून शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. मुलींनी नोकरी व रोजगाराची मोठमोठी क्षेत्रे काबीज करून उच्च पदावर जाण्याचे ध्येय बाळगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन संचालन डॉ. ओमप्रकाश कश्यप यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते विनोद शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विलास पाटील, अविनाश बागडे, पूजा वाघाडे यांनी अथक परिश्रम घेतले.