लसीकरणासाठी महापौरांनी वाढविला विद्यार्थ्यांचा उत्साह

-१५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण केंद्राला दिली भेट

नागपूर, ता. ३ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सोमवार, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महापौरांनी राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया आणि सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कुल, सिव्हिल लाईन्स येथे भेट दिली. त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक सुध्दा उपस्थित होत्या. नागपूरात २० स्थायी केन्द्रांवर या वयोगटासाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

          यासंदर्भात बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. याच श्रृंखलेत नागपुरात आजपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. आज लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या असता विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग संपूर्ण क्षमतेने लसीकरण मोहिमेत गुंतला आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मनपा, शासकीय व खासगी असे सुमारे १५ ते १६ केंद्र सध्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालकांच्या संमतीने महाविद्यालयांच्या माध्यमातूनही लसीकरण करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

          महापौरांनी लसीकरण केंद्रांना भेट दिली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. लसीकरण मोहीमेत आम्ही सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतानाच याबाबत जनजागृतीही करू, असा विश्वास विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

          मनपातर्फे २० स्थायी केन्द्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मनपाकडे आलेल्या विनंतीवरुन शहरातील ३३ शाळा आणि महावि‌द्यालयांमध्ये लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी अनिवार्य असून शैक्षणिक संस्थांमधील केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीची गरज नाही. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल सोबत बाळगणे आवश्यक आहे. १८ वर्षावरील वयोगटाचे लसीकरण नियमित सुरूच राहणार आहे.

          नागपूर शहरात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी स्थायी केन्द्र याप्रमाणे आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), एम्स, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, एम्समधील आयुष इमारत, प्रगती सभागृह, दिघोरी, आयसोलेशन हॉस्पिटल, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड, सच्चिदानंद नगर उद्यान, स्व. प्रकारराव दटके महाल रोगनिदान केंद्र, स्पोर्ट ॲकेडमी आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सूतिकागृह, एस.ई.रेल्वे मोतीबाग, पाटीदार भवन (सतनामी) , लालगंज आयुर्वेदिक रुग्णालय, ललिता पब्लीक स्कूल, वेकोलि, राजकुमार गुप्ता समाजभवन बजेरिया आणि मध्य रेल्वे रुग्णालय, पोलीस हॉस्पीटल, पोलीस मुख्यालय काटोल रोड या केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत कोव्हिड प्रतिबंधात्मक लस दिली जाईल. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल. त्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. ३१ डिसेंबर २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. लस घेतल्यानंतर मुलांची देखरेख करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध राहतील आणि त्यांना अर्ध्या तासाने घरी सोडले जाईल. शैक्षणिक संस्थांमधील केंद्रावर विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना लस देण्यात येईल. केंद्रावर विद्यार्थ्यांना अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले जाईल.

          कोरोनाच्या संक्रमनापासून सुरक्षेसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यावश्यक आहे. शहरात सध्या १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आता ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. या वयोगटात विद्यार्थी असल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. या सर्व प्रतिनिधींद्वारे लसीकरणासाठी मनपाला सहकार्य मिळाले आहे. सोमवारी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३३ शैक्षणिक संस्थांनी लसीकरण केंद्रासाठी मनपाकडे विनंती केली. त्यानुसार या केंद्रांवर मनपाद्वारे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांच्या संमतीनेच मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

          महापौरांव्यतिरिक्त उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, लकडगंज झोन सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही विविध केंद्रांना भेटी देऊन लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सुदर्शन नगर येथे फुले दांपत्य दिवस मोठया उत्साहाणे साजरा

Mon Jan 3 , 2022
नागपूर  : महिलांच्या उध्दांरासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोध्दाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणा-या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणा-या २ जानेवारी फुले दांपत्य दिवस तसेच अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती यानिमित्त  सुदर्शन नगर, घोडके प्राथमिक शाळा, न्यु नरसाळा रोड येथे मोठया उत्साहपूर्ण वातावरणात सौ.सुनंदा प्रदीप रायपूरे यांच्या अथक प्रयत्नाने फुले दांपत्य हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com