– डॉ. गजानन नाईक यांचे दर्जेदार वाण तयार करणारे यशस्वी शोधप्रबंध
– शेतकऱ्यांना उत्पादनासह मिळणार गुणवत्तापूर्ण चारा
नागपूर :- ज्वारी हे भरडधान्यांपैकी महत्वाचे पीक आहे. किमान निविष्ठांसह, विविध हवामान व भौगोलिक परिस्थितीत विशेषतः अवर्षण स्थितीत धान्यासह कडबा उत्पादन देखील ते देते. काही वर्षांपूर्वी ज्वारीची भाकरी हा दररोजच्या आहारातील प्रमुख अन्नपदार्थ होता. आज त्याची काही प्रमाणात जागा गव्हाने घेतली आहे. परंतु, भारतात ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. कमीत कमी निविष्ठांसह विविध हंगाम व भौगोलिक परिस्थितीत घेता येणारे पीक म्हणून ज्वारी प्रसिद्ध आहे. रोजच्या आहारातील मुख्य स्त्रोताचे अधिक उत्पादन क्षमता वाढवावी या हेतूने अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहे. अशातच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) चे संशोधक डॉ. गजानन हनुमंतराव नाईक यांनी पिवळ्या ज्वारी अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारे प्रोजेनीस शोधले आहे.
‘महाज्योती’ मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत डॉ. नाईक यांचा पीएचडीचा विषय ‘स्टडी ऑन इंड्यूज्ड म्युटेशन इन येलो पेरिकार्प सोरघम (सोरघम बाइकलर एल. मोन्च)’ असा होता. डॉ. नाईक यांनी कृषि वनस्पती विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. एच. व्ही. काळपांडे यांच्या मार्गदर्शनात आपला शोधप्रबंध 3 वर्षात यशस्वी पूर्ण केला. ‘महाज्योती’च्या नागपुरच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी संस्थेचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांच्या हस्ते डॉ. गजानन नाईक यांना मेडल आणि सन्मान वस्त्र देत सत्कार करण्यात आले. यावेळी लेखाधिकारी रश्मी तेलेवार यांची उपस्थिती होती.
डॉ. नाईक यांनी सांगितले की, अधिक उर्जा, तंतुमय पदार्थ, स्टार्च, प्रथिने आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारी ज्वारी हा रोजच्या आहारातील स्वस्त आणि मुख्य स्रोत आहे. पिवळी ज्वारी या पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता तयार करण्याचे वाण तयार करण्याचे शोध प्रबंध तयार केले. या प्रयोगासाठी मी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या साह्याने किरणोत्सार तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिवळ्या ज्वारीमध्ये जनुकीय बदल घडवले. या बदलातून अधिक उत्पादनक्षम, दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तग धरू शकणारे आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असलेले काही प्रोजेनीज शोधले आहेत. यामधून भविष्यात पिवळ्या ज्वारीचा अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारा वाण विकसित होईल. तसेच शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल असे मनोगत डॉ. नाईक यांनी व्यक्त केले. डॉ. नाईक यांनी ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत वावगे यांचे सहकार्यासह वडिल हनुमंतराव नाईक आणि आई संगिताबाई नाईक यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार असा विश्वास डॉ. नाईक यांनी व्यक्त केले.
देशासह राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा : मंत्री अतुल सावे
महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी पिवळ्या ज्वारी पिकांवर यशस्वी संशोधन करणाऱ्या डॉ. गजानन नाईक यांचे यांचे कौतूक केले. मंत्री अतुल सावे म्हणाले की,‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज महाज्योतीच्या मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे विविध क्षेत्रात महाज्योतीचे विद्यार्थी यशस्वी संशोधन करीत आहेत.
अशातच आज कृषी विज्ञानावर महाज्योतीचे संशोधक डॉ. गजानन नाईक यांनी पिवळ्या ज्वारी पिकांवर केलेला अभ्यास हे कौतुकास्पद आहे. यामुळे ज्वारी पिकावर अधिक उत्पादनक्षम आणि चाऱ्याची उत्तम गुणवत्ता असणारे प्रोजेनीसचा अभ्यास हा आपल्या कृषी प्रधान असलेल्या भारताला प्रगती पथावर नक्की नेणार. डॉ. नाईक यांच्या उपयुक्त संशोधनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार हे अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. महाज्योतीने आता ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर अशी प्रतिक्रीया मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी डॉ. गजानन नाईक यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.