– रोजगार मेळाव्यात १०४ जणांना विविध विभागांचे नियुक्तीपत्र प्रदान
नागपूर :- सरकारी नोकरी करताना आपल्यावर लोकसेवेची जबाबदारी आहे, अशी भूमिका बाळगणे गरजेचे आहे. आज ज्या तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान होत आहे त्यांनी व्यवस्था प्रभावी करण्यावर आणि लोकाभिमूख करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
सिव्हिल लाइन्स येथे स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मध्य रेल्वेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते १०४ जणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला मध्य रेल्वे नागपूरचे एडीआरएम पी.एस. खैरकर, मध्य रेल्वेचे एडीआरएम रुपेश चांदेकर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे एडीआरएम श्रीकांत चंद्रिकापुरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे देशभरातील नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. तत्पूर्वी, ना.नितीन गडकरी यांनी विचार मांडले. ते म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसाला सरकारी विभागांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे देशासाठी, समाजासाठी चांगले काम करण्याचे व्रत स्वीकारा. आपण कसे काम करता त्यावर सरकारी विभागांकडे बघण्याचा दृष्टीकोन ठरेल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यादृष्टीने देशात मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम झाले तरच ते शक्य आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी रेल्वे, डाक विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृह विभाग, संरक्षण विभागातील नियुक्त्यांचे पत्र प्रदान करण्यात आले.