मुंबई :- दहशतवादी राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरच्या विघातक वापराने सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी ११ फेब्रुवारी पर्यंत ड्रोन आणि तत्सम वस्तूंच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश पोलीस उपआयुक्त विशाल ठाकूर यांनी दिले आहेत.
अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा आणि सार्वजनिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी मुंबई क्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाइट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादींच्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारी पर्यंत बंदी आहे. मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप-आयुक्त यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील. या आदेशाचे पालन न केल्यास कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
@ फाईल फोटो