वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारले जातील – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : औद्योगिक वसाहतीत आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यरत असते. तेथे अग्निशमन यंत्रणा सक्षम करीत असताना येत्या वर्षभरात एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये सोलापूर औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच औद्योगिक वसाहतीजवळ अग्निशमन केंद्र उभारले जाण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वसाहतीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. आगीसंदर्भात घटना घडल्यास तत्काळ परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी उद्योग विभाग पुढाकार घेईल.अग्निशमन केंद्र नेमके कोठे उभारायचे याबाबत एमआयडीसी आणि संबंधित महानगरपालिकेमार्फत ठरविण्यात येईल. याबाबत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर येथील औद्योगिक संघटनांनी कायमस्वरुपी अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. या केंद्रासाठी अंदाजे ४००० चौ. मी. जागा लागणार असून सदर जागा एमआयडीसी क्षेत्रात मुख्य रस्त्यालगत मिळावी असा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२३ रेाजी एमआयडीसी मुख्यालयात आला असून याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

सोलापूर महानगरपालिकेची सन १९९२ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर तेथील अक्कलकोट रोड औद्योगिक क्षेत्र पायाभूत सुविधा आणि देखभाल दुरुस्तीसाठी सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. या एमआयडीसीकरिता पायाभूत सुविधा सोलापूर महानगरपालिकेकडून देण्यात येत आहेत. सोलापूर एमआयडीसी क्षेत्रात नोव्हेंबर २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये ४ कारखान्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून पाण्याच्या टाकीजवळ तात्पुरते पत्राशेड करुन एक अग्निबंब आणि एक फोम टेंडर अग्निबंब असे दोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

याशिवाय असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून असंघटित कामगार मंडळामार्फत कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परिवहन महामंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल - दादाजी भुसे

Tue Mar 14 , 2023
मुंबई :- पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहनमंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य सिध्दार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पुणे शिवाजीनगर येथील कामांसंदर्भात तसेच वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. याला आज मंत्री दादाजी भुसे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!