संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले होते निवेदन
– रामटेक येथील प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
नागपूर :- नागपूर ते रामटेक लोकल ट्रेन ब्रिटीश काळापासून धावत आहे. कोरोनाच्या काळात स्पेशल ट्रेन म्हणून तिचे भाडे 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आले होते. ते दर आता पूर्ववत म्हणजेच 10 रूपये इतके झाले आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी सर्वप्रथम याची दखल घेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार तुमाने यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. तर काहींचे तिकीट भाडे वाढवण्यात आले. कोरोना संपल्यानंतर भारतातील सर्व गाड्यांचे तिकीट दर पूर्वीसारखेच राहिले. पण रामटेक लोकलचे तिकीट भाडे कमी झाले नाही. तिकीट दरात तिपटीने वाढ झाल्याने प्रवाशांवर मोठा अन्याय होत होता. या लोकल ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात मजूर, व्यापारी, विद्यार्थी, भाजी विक्रेते आणि दूध विक्रेते प्रवास करतात. तिप्पट दरवाढीमुळे प्रवाशांची संख्या घटल्याने रेल्वेचा महसूलही घटला. यासंदर्भात रामटेक येथील प्रवाशांच्या शिष्टमंडळाने खासदार कृपाल तुमाने यांची भेट घेऊन ही समस्या निदर्शनास आणून दिली. खासदार तुमाने यांनी लगेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. केंद्रीय मंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रामटेक लोकलचे तिकीट दर 30 रूपयांवरून 10 रूपये इतके झाले आहे.
खासदार कृपाल तुमाने यांनी रामटेक लोकल यांसह अनेक रेल्वे समस्यांची दखल घेत शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. काटोल, नरखेड आणि कामठी रेल्वेस्थानकावरील एक्सप्रेस थांब्याचा प्रश्न देखील केंद्राकडे लावून धरला आहे. काटोल, नरखेड आणि कामठी येथे सध्या अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे.