…..भारतीय सेनेत अधिकारी बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, त्यातील काहीच यशस्वी होतात. यात यवतमाळ येथील संभाजीनगर मधील सावित्रीबाई फुले सोसायटी मधील कार्तिक राजू बाजारे याने आपल्या जिद्द व मेहनतीच्या बळावर भारतीय नौदलात सबलेफ्टनंट पदावर अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने हे यश जिद्दीच्या बळावर प्राप्त केले. कार्तिक चे प्राथमिक शिक्षण कारंजा(घा ) येथे झाले. तर दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने यवतमाळ येथील महर्षी विद्यामंदिर येथे घेतले. दहावीत चांगले गुण मिळाल्याने जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या त्याच्या पालकांनी त्याला पुढील
शिक्षणाकरिता शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीमध्ये एनडीए परीक्षेची तयारी करण्याकरिता पाठवले. त्यानंतर त्याने एनडीएची पूर्वपरीक्षा पास केली.पण वैद्यकीय चाचणीत त्याची निवड न झाल्याने त्याची ती संधी हुकली बारावीनंतर त्याने संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. त्यानंतर त्याने एनडीएच्या तयारीवरच इंडियन नेव्ही एसएससी टेकएन्ट्री अंतर्गत डिफेन्स ऑफिसर बनण्याचे ठरवले. व दिडवर्षापूर्वी एसएससी इंडियन नेव्ही एन्ट्रीमार्फत त्यांची एसएसबी मुलाखत घेण्यात आली.एसएसबी मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर केरळमधील एझिमला येथील इंडीयन नेव्हल अकेडमी येथे त्याने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. दीक्षांत समारंभाला आई-बाबांची उपस्थिती..
नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये अधिकारी झालेल्या कार्तिक बाजारे यांना बघण्यासाठी त्यांचे आई-वडील व त्याचे शिक्षक व मित्रमंडळी केरळला उपस्थित होते. कार्तिक बाजारे यांचे स्वप्न पूर्ण होत असताना बघून त्यांच्या आई-वडिलांचा ऊर यावेळी भरून आला होता. आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात दिसत होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून सामान्य कुटुंबातील कार्तिकने डिफेन्समध्ये ऑफिसर बनून अन्य विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
….आईच्या डोक्यावर सन्मानाने घातली कॅप…
• कार्तिकचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. हा सुखद सोहळा आई- बाबांनी बघितला. कार्तिकने डोक्यावरील अधिकारी कॅप मोठ्या सन्मानाने आईच्या डोक्यावर घातली. यावेळी आईने त्याचे कौतुक करीत अश्रूना वाट मोकळी करून दिली…..
भारत सरकारच्या इंडियन नेव्हल अकॅडमी, एजीमला येथे कार्तिक ने १२ महिन्याचे इंडियन नेव्हीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण.केले तो भारतीय नौदलात सब- लेफ्टनंट पदावर नियुक्त झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.