सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधिनींच्या उपस्थितीत टास्क फोर्स समितीची बैठक
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे पोलिओ निर्मूलनासाठी २७ फेब्रुवारी २०२२ ते ५ मार्च २०२२ या कालावधीमध्ये पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येत आहे. पोलिओचे शंभर टक्के लसीकरण व्हावे, कुणीही बाळ लसीकरणापासून अलिप्त राहू नये यासंदर्भात नियोजनाबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात टास्क फोर्स समितीची बैठक बुधवारी (ता.२३) घेण्यात आली.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डब्ल्यू.एच.ओ.चे सर्व्हिलियन्स मेडिकल ऑफिसर डॉ.मो. साजीद यांच्यासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी, मनपाचे सर्व झोनल आरोग्य अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण शहरात व्यापक प्रमाणात राबविली जावी यासंदर्भात प्रारंभी .एच.ओ.चे सर्व्हिलियन्स मेडिकल ऑफिसर डॉ.मो. साजीद यांनी संपूर्ण अभियानाची माहिती दिली. शहरातील शाळा, आंगणवाडी येथे मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्यांच्या समन्वयातून लसीकरण अभियान राबविणे, बांधकाम क्षेत्र व अन्य ठिकाणी मजूरी करणा-या वर्गातील बाळांचेही लसीकरण व्हावे यासाठी सर्वत्र कार्यवाही करण्याबाबत यावेळी निर्देशित करण्यात आले. मनपाच्या सर्व झोन स्तरावर झोनल वैद्यकीय अधिका-यांनी आरोग्य कर्मचा-यांसह आशा सेविकांच्या माध्यमातून लसीकरण अभियान राबवावे. रेल्वे, बसेस, मेट्रो येथेही प्रवासादरम्यान पोलिओचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपाचे आरोग्य विभाग, रेल्वे आरोग्य विभागाद्वारे कार्यवाही करण्यात यावी. शहरातील ज्या घरातील बालकांचे लसीकरण झाले अशा घरांवर आणि बालकांच्या बोटांवरही खुणा करण्याबाबत यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी निर्देश दिले.
टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ए.आय.पी.आय., सी.जी.एच.एस., मध्य रेल्वे हॉस्पिटल वरीष्ठ मंडळ, रोटरी ३०३ क्लब, ई.एस.आय.एस. हॉस्पिटल, डॉ.आंबेडकर हॉस्पिटल, डब्ल्यू.सी.एल. हॉस्पिटल, ई.सी.एस. रेल्वे पॉलिक्लिनिक, संरक्षण आस्थापना विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, सहायक संचालक नगररचना, परिवहन विभाग मनपा, बी.एस.एन.एल., ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन, मेट्रो रेल्वे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, क्रीडा अधिकारी, लोककर्म विभाग, पोलिस संचालक कार्यालय, समाजविकास अधिकारी, सहायक आयुक्त कामगार, नॅशनल कॅडेटकोर, नेहरू युवा केंद्र संघटन, नॅशनल सर्व्हिस स्कीम, आदिवासी विकास विभाग, स्मार्ट सिटी, डब्ल्यू.एच.ओ., युनिसेफ, यूएनडीपी, बीएमजीएफ, जेएसआय, सीएचएएल, आयपीई ग्लोबल, लॉयन्स, रोटरी आदींच्या प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती.