– घराच्या मोकळया जागेत पुरलेल्या अस्थीवर केले वृक्षारोपन
नागपूर :- जीवन अनिश्चित आहे, पण मृत्यू अटळ आहे. खरे तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. वस्तुत: मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे. मृत्यूशिवाय जन्माला अर्थ नाही. अंधार आहे म्हणून उजेडाला महत्त्व आहे. जन्म आणि मृत्यू ही एकाच प्रवाहाची दोन टोके आहेत. या दरम्यानच्या आठवणींचा प्रवास असाच सुरू राहावा म्हणून शहरातील प्रसिध्द बाल रोगतज्ज्ञ डॉ. सूचित बागडे यांनी वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता त्या घरीच मोकळ्या जागी पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण केले. झाडाच्या माध्यमातून वडिलांच्या आठवणी सोबत राहतील. अंतिम प्रवासाचे झाड हे नेहमी फुललेलेच राहील. त्यांच्या विज्ञानवादी आदर्शाची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे.
जन्माची नाळ कशाशी जुळली असते हे सत्य कळले आहे. पण मरणाचा जाळ नेमका कुठून, कधी आणि कसा येतो हे नेमके कळत नसले तरी मृत्यू अटळ आहे. रामचंद्र बागडे यांची वयाच्या 92 वर्षी प्राणज्योत मालवली. मुलगा डॉ. सुचित बागडे यांनी सामाजिक प्रथेला बाजुला सारून त्यांच्या पार्थिवार डिझेल वाहिणीत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अस्थी पाण्याच्या प्रवाहात न सोडता, पॉवर ग्रीड येथील निवासस्थानी मोकळ्या जागेत पुरल्या. त्यावर वृक्षारोपण केले. देह सरणावर ठेवण्यापुर्वी डोळे भरून पाहण्याची सार्वांनाच घाई असते. त्या देहाला सजविणे, गरम पाण्याने आंघोळ घालणे, अस्थी विसर्जनानंतर भोजनदान करणे ही एक सामाजिक प्रथा आहे. मात्र, डॉ. सुचित बागडे यांनी ही सामाजिक प्रथा मोडीत काढून विज्ञानवादी आदर्श ठेवला. यावेळी भाउ सुहास बागडे, सुधीर बागडे (कॅनडा) आणि मित्र परिवार उपस्थित होते. अस्थी विसर्जन आणि तिसर्या दिवसाला येणारा संपूर्ण खर्च समाजिक संस्थेला दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
झाडाच्या सावलीच्या रूपात वडिलांचे छत्र
आंबेडकरी चळवळ आणि धम्म कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहीला. वडिलांनी आयुष्यभर सामाजिक कार्यात योगदान दिले. विज्ञानवादी आदर्श डोळ्यासमोर ठेवून वडिलांच्या अस्थि घराच्या मोकळ्या जागेत पुरल्या. त्यावर वृक्षारोपन केले. झाडाच्या रूपात ते नेहमीच आमच्या डोळ्यासमोर असतील. वृक्षाच्या सावलीच्या रूपात त्यांचे छत्र आयुष्यभर असेल. आयुष्यातील क्षण नेहमी बहरलेले राहतील. या झाडाला मोठ करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
डॉ. सुचित बागडे, बालरोग तज्ज्ञ