नागपूर :- शेतकर्यांनी गहू व तांदळाऐवजी आपल्या पुरातन भरडधान्याचे उत्पादन घेऊन स्वत: व देशाला निरोगी ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन ‘मिलेट मॅन ऑफ इंडिया’ पद्मश्री डॉ. खादर वली यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षांतर्गत मीडिया पार्टनर देशोन्नती, जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, सायखेडा, नवनिनाद फाउंडेशन व न्युट्रीशन सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा मार्गावरील सदाबाई रायसोनी वुमेन्स महाविद्यालयात मिलेटसवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.खादर वली बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विवेक कपूर, डायरेक्टर जी.एच.आर. आय.ई.टी, डॉ.श्रीराम जोशी, रजिस्ट्रार, जी.एच.रायसोनी युनिव्हर्सिटी, सायखेडा, प्रा. अमिना वली, वसुधा पॉल, प्रा. ए.एन.राधा व देशोन्नतीचे विशेष आरोग्य प्रतिनिधी अभय राजकारणे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. खादर वली म्हणाले, गहू व तांदळाला जे पाणी एक वर्षात लागते, तेवढ्याच पाण्यात २७ ते ३० वर्षे आपण भरडधान्याचे उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी याकडे वळले पाहिजे. तसेच वैज्ञानिकांनी यावर संशोधन करून आणखी माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. डॉ. खादर वली यांनी याप्रसंगी आंबिलबद्धल माहिती दिली. जेवणाच्या पाच मिनिटे आधी आंबील घेतल्यास मायक्रोबियल असंतुलन दूर होऊ शकते व रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. पाच श्रीधान्य कोदो, कुटकी, कांगणी, मुराद व हरा सांवा यांचा वापर केल्यास ग्लुकोज, मायक्रोबियल व हार्मोन्सचे असंतुलन दूर होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अभय राजकारणे यांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले, डॉ. खादर अली यांच्या सिरिजीवन लाईफस्टाईलमुळे मधूमेह व उच्च रक्तदाबाच्या गोळ्या सुटल्या. गेल्या अडीच वर्षापासून रोगमुक्त जीवन जगत आहे. तसेच माझ्या पत्नीला गायनिक समस्या होत्या व शल्यचिकित्सकांनी युट्रेरस (गर्भपिशव्या) काढण्याचा सल्ला दिला होता. परंतु, डॉ. खादर वली यांच्या प्रोटोकॉनुसार आहारात बदल केल्यामुळे त्याची गरज भासली नाही. तसेच तीन महिन्यात दहा किलो वजन कमी झाले. मिलेटमुळे आरोग्यच नाही तर पर्यावरण, कृषीसमस्यावर देखील आपण मात करू शकतो, असेही राजकारणे याप्रसंगी म्हणाले.
सर्वप्रथम पाहुण्यांद्वारे दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ.सबिहा वली यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. डॉ. श्रीराम जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. वसुधा पॉल यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.