– एक रुपयात पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै
नागपूर :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक सेतू केंद्रांना भेटी देऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. केवळ एक रुपयात पिक विमा काढला जात असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा 31 तारखेपर्यंत भरला जाईल. यासाठी सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांना यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
सेतू केंद्राच्या मालकांनी देखील एक सामाजिक कार्य म्हणून अधिकाधिक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. आपापल्या गावांमध्ये सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेतील याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन सरपंचांना, गावातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.
शासनाने यावर्षीच्या हंगामासाठी पीक कर्ज मोठ्या प्रमाणात उपलब्ध करायचे निश्चित केले आहे. तसेच केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा काढण्याची मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. पीक कर्जाचे 31 जुलैपर्यंत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करा. सप्टेंबर महिण्यात कर्ज वाटप पूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पीक विमा वाटपात नागपूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या तीनमध्ये असायला हवा, हेच आपले उद्दिष्ट असून त्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
गावागावात एक रुपयामध्ये पीक विमा काढण्याचा योजनेला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांच्या स्वाक्षरीने प्रत्येक संरपंचासाठी पत्र देण्यात देण्यात आले आहे.
गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (बँक व सेतू केंद्रात फक्त अर्ज करुन) एक रुपयात पीक विमा काढून शंभर टक्के सहभाग नोंदवावा. विमा काढण्यासाठी सातबारा, आधारकार्ड व बँकेचे खाते आवाश्यक असून आपले सेवा केंद्र, सीएसी केंद्र, सेतु केंद्रात जाऊन एक रुपयात आपला विमा काढून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.