नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जाणार,धर्माच्या नावाने अर्थसंकल्पाची फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव ! – नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौप्यस्फोट

नाशिक :- या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होणार असून मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान देखील त्यांना मिळणार नाही. कदाचित त्याची जाणीव झाल्यामुळेच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने आपली दुकाने बंद करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला विरोधी पक्षांना दिला असून महाराष्ट्रातील नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक ) येथे झालेल्या विराट विजय संकल्प सभेत बोलताना वर्तविले. धर्माच्या आधारावर देशाच्या अर्थसंकल्पाचीही फाळणी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा गंभीर आरोपही मोदी यांनी केला.

भाजपा-महायुतीच्या दिंडोरीच्या उमेदवार डॉ.भारती पवार, नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार खिल्ली उडविताना कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सखोल मुक्त चिंतन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आ.डॉ.राहुल आहेर आदी यावेळी उपस्थित होते .

तुमची सेवा हेच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय आहे. गेल्या दहा वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे, आज तिसऱ्या कार्यकालात विकसित भारत बनविण्यासाठी आशीर्वाद मागण्याकरिता मी तुमच्यासमोर आलो आहे, असे सुरुवातीसच सांगून मोदी यांनी देशाच्या विकासाच्या वाटचालीचे गेल्या दहा वर्षांचे एक चित्र जनतेसमोर सादर केले.

भाजपा -एनडीए आघाडीला प्रचंड विजय मिळणार याची जाणीव इंडी आघाडीच्या एका नेत्याला अगोदरच झाली आहे, असे शरद पवार यांचा नामोल्लेख न करता मोदी म्हणाले. निवडणुकीनंतर सारेजण एकत्र आले तर कदाचित मान्यताप्राप्त विरोधी पक्षाचे स्थान मिळू शकेल, असा त्या नेत्याचा समज आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार हे नक्की आहे. जेव्हा ते घडेल, तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण नक्कीच होईल. जेव्हा आपला पक्ष काँग्रेससोबत जाईल, तेव्हा मी शिवसेनेचे दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणत असत. हे दुकान बंद होण्याची वेळ आली, असा याचा अर्थ आहे. विनाशाचा हा क्षण बाळासाहेबांना क्लेश देणारा असेल, कारण नकली शिवसेनेने बाळासाहेबांची सारी स्वप्ने धुळीस मिळविली आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द व्हावे, ही बाळासाहेबांची स्वप्ने होती. ती पूर्ण झाली, पण याचा सर्वाधिक विरोध नकली शिवसेनेकडून सुरू आहे, असे श्री.मोदी म्हणाले. नकली शिवसेनेप्रमाणे नकली राष्ट्रवादीनेही राम मंदिर प्रतिष्ठापनेचे निमंत्रण झिडकारले. काँग्रेस आणि नकली शिवसेना यांच्यात पापाची भागीदारी असून संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे पाप उघड झाले आहे, असे ते म्हणाले. ज्या काँग्रेसने वीर सावरकरांना सतत अपमानित केले, त्या काँग्रेसला खांद्यावर घेऊन नकली शिवसेना राजकारण करत आहे, असा आरोप मोदी यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे, पण नकली शिवसेनेला अहंकारामुळे याची जाणीवही झालेली नाही. काँग्रेससमोर गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला धडा शिकविण्याची स्वाभिमानी महाराष्ट्राची तयारी झालेली आहे, असेही ते म्हणाले.

आज आम्ही गरीबांना मोफत धान्य, पक्की घरे, घराघरात वीज, पाणी, गॅस जोडणी देत आहेत. आम्ही कधीही कोणाचा धर्म पाहिला नाही, कोणाचा धर्म विचारला नाही. सर्वांसाठी योजना बनविल्या जातात, आणि त्याचा लाभ सर्वांना समान रीतीने दिला जातो. पण काँग्रेसची नियत ठीक नाही. देशाच्या अर्थसंकल्पातील 15 टक्के रक्कम केवळ अल्पसंख्याकांसाठी खर्च करावी असा काँग्रेसचा विचार आहे. धर्माच्या नावाने त्यांनी देशाचे विभाजन घडविले, आजही धर्माच्या नावाने अर्थसंकल्पाचे विभाजन करण्याचा तोच डाव पुन्हा खेळला जात आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसने अर्थसंकल्पाचे वितरण धर्मानुसार करण्याच्या प्रस्तावास हिरवा झेंडा दाखविला होता. हा केवढा धोकादायक विचार आहे, पण काँग्रेसकरिता अल्पसंख्याक म्हणजे केवळ त्यांची मतपेढी आहे. मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या या प्रस्तावास जोरदार विरोध केला होता. देशाच्या अर्थसंकल्पाची 15 टक्के रक्कम केवळ मुस्लिमांकरिता खर्च करण्याचा काँग्रेसचा विचार होता, पण भाजपाच्या प्रखर विरोधामुळे तो यशस्वी झाला नाही. आता तोच जुना अजेंडा पुन्हा लागू करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्रातीलच नेता केंद्रात कृषीमंत्री होता, पण त्या सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली नाही. आज किसान सन्मान निधीतून दर वर्षी प्रत्येक शेतकरी कुटुंबास महाराष्ट्रात वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळतात. काँग्रेसच्या काळात केवळ खोटी पॅकेज जाहीर होत होती. त्यापैकी एक रुपया देखील शेतकऱ्यास मिळत नव्हता, आम्ही शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. गेल्या हंगामात सात लाख टन कांदा खरेदी केला, आमच्या सरकारने पहिल्यांदा त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली, गेल्या दहा वर्षांत कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातीवरील निर्बंध हटविले असून दहा दिवसांत 22 हजार टन कांदा निर्यात झाला आहे. कांद्याच्या वाहतुकीवर सबसिडी देण्याची योजना लागू करण्यात येत आहे. क्लस्टर विकास योजनेचा लाभ द्राक्ष उत्पादकांना होईल. लोककल्याणाची अशी हमीपूर्ण कामे करण्यासाठी भाजपा-रालोआच्या उमेदवारांना विजयी करून देशाचे, भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करा, असे आवाहन अखेरीस पंतप्रधानांनी केले.

हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकतात, हे मतांच्या लाचारीसाठी दिसणारे दुर्दैवी दृश्य आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत बोलताना केला.

जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष उत्पादकांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने विशेष योजना आखल्या आहेत. कांदा, द्राक्षे निर्यातीसाठी सरकारने अनुदान दिले, नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले तर तातडीने भरपाई दिली जाते. कांदा चाळींना अनुदान दिले जाते. कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे, बँकांकडून वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून मदत केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व दिंडोरीच्या भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिली. जलजीवन योजना, पीएम किसान सन्मान निधीतून लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली. मतदारसंघातील 21 लाख लोकांना मोफत धान्य दिले. 95 हजारांहून जास्त लोकसंख्येला घरकुल योजनेतून घरे मिळाली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 175 किलोमीटरहून जास्त रस्ते झाले, 45 हजार युवकांना स्वयंपूर्णतेचे प्रशिक्षण दिले गेले. ग्रामीण भागाच्या सौरउर्जा प्रकल्पासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी मोदी हेच पंतप्रधान असले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NADP PGDM STUDENT IMMERSION PROGRAM COMMENCES AT IIM-INDORE

Wed May 15 , 2024
Nagpur :-National Academy of Development and Progress (NADP) has launched its PGDM student immersion program at the prestigious Indian Institute of Management, Indore (IIM-I). The program began with an inaugural session held on May 14, 2024 as part of mentoring by IIMI. Dr.Saumya Ranjan Dash, Professor and Dean of Research at IIM-I, warmly welcomed the students and provided them with […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com