पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध, प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल

– भाजपा कायदा विभागाचे प्रमुख ॲड. चौबे यांची माहिती

पालघर :- लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याबाबतचे भाजपा केंद्रीय कार्यालयाचे खोटे पत्र प्रसारित केल्याबद्दल प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आचार संहिता व काय़दा विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.अखिलेश चौबे यांनी ही माहिती बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपाच्या खोट्या लेटरहेडवर व्हायरल करण्यात आलेले हे पत्र म्हणजे दोन पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्याचेही ॲड.चौबे यांनी सांगितले. प्रदेश भाजपा कायदा प्रकोष्ठचे संयोजक ॲड. शहाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.

चौबे यांनी सांगितले की, पालघर मतदारसंघासाठी प्रकाश निकम यांना भाजपातर्फे उमेदवारी दिल्याचे पक्षाचे केंद्रीय कार्यालयाचे बनावट पत्र समाजमाध्यमांतून प्रसारित झाल्याचे कळताच आपण त्या विरोधात मंगळवारी रात्री उशिरा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भाजपाच्या बनावट लेटरहेडवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रकाश कृष्णा निकम यांना उमेदवारी दिल्याचे पत्र प्रसिद्ध करून भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला हा कट असून त्याची कसून चौकशी करण्याची मागणी आपण केली आहे.

पालघर लोकसभा जागेसाठी अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नसताना जाणूनबुजून खोटे पत्र व्हायरल करून महायुतीच्या भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये नाहक तेढ निर्माण करण्याचा केलेला हा प्रयत्न हाणून पाडू असेही चौबे यांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 417 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आल्याचे ॲड. चौबे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, थोडक्यात बचावले

Thu Apr 18 , 2024
भंडारा :-माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com