पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या साडेनऊ वर्षांच्या कारकीर्दीत विरोधकांनी त्यांच्यावर केलेला सर्वात मोठा आरोप हा आहे की, “मोदींनी जाहीर करूनही देशातील प्रत्येक नागरिकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये अजून जमा केलेले नाही. म्हणजे, लोकांची फसवणूक केली.” कुठलीही खातरजमा करून न घेता, सोशल मीडियावर, सभांमध्ये, पत्रपरिषदांमध्ये हा आरोप सर्रास केला जात असतो. 28 डिसेंबरला नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवस सभेतही हाच आरोप पुन्हा करण्यात आला. खुद्द काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनीच उपस्थितांना विचारले- “मोदी प्रत्येकाला 15 लाख रुपये देतो म्हणाले. तुम्हाला मिळाले का ?” हाच प्रश्न गेली साडेनऊ वर्षे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून मुद्दाम विचारून देशातील जनतेला भ्रमित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वास्तविक, परदेशी बॅंकांमधील भारतीय काळा पैसा अजून परत का आला नाही, हा खरा प्रश्न आहे. पण तो राहिला बाजूला
15 लाखांच्या आरोपातील खरेखोटेपणा तपासण्यासाठी आपल्याला साडेनऊ वर्षांपूर्वीच्या काळात, छत्तीसगढ राज्यात जावे लागेल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कांकेर येथील जाहीर सभेत मोदी नेमके काय बोलले बघा. ते म्हणाले-
“मेरे कांकेरके भाईयो-बहनो, मुझे बताइए कि हमारा चोरी किया हुआ पैसा वापिस आना चाहिए कि नही आना चाहिए ? ये काला धन वापिस आना चाहिए ? ये चोर-लुटेरोंसे एक-एक रुपया वापिस लेना चाहिए ? इस रुपयोंपर जनताका अधिकार है कि नही है ? ये रुपया जनताके काम आना चाहिए ? (सर्व प्रश्नांना जनतेकडून होकारार्थी प्रतिसाद) अरे एक बार ये जो चोर-लुटेरोंके पैसे विदेशी बैंकोमे जमा है ना, उतनेभी हम लेके आए तोभी हिंदुस्थानके एक एक गरीब आदमीको पंधरा-बीस लाख रुपये मिलही जाएंगे, इतना रुपया है। ये हमारे एमपी साब कह रहे थे, रेल्वे लाईन। ये काला धन वापिस आ जाए, जहां चाहो वहां रेल्वे कर सकते हो। ये लूट चलाई है। और बेशरम होकरके कहते है। सरकार आप चलाते हो और पूछते मोदीको हो कि कैसे लाए ? जिस दिन भारतीय जनता पार्टीको मौका मिलेगा, एक एक पाई हिंदुस्थानमे वापिस लायी जाएगी और हिंदुस्थानके गरिबोंके लिए काममे लायी जाएगी। ये जनताके पैसे है, गरीबके पैसे है। हमारा किसान खेतमे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है। उसपर हिंदुस्थानका अधिकार है, हिंदुस्थानके कोटि कोटि गरिबोंका अधिकार है। और उनको वो धन मिलना चाहिए, ये हम संकल्प करते है।”
या संपूर्ण भाषणात “प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जातील”, असे कुठे म्हटले आहे ? उलट, मोदी 15 ऐवजी 15-20 लाख रुपये म्हणाले. पण गरीब लोकांसाठी, सर्वांसाठी नव्हे ! परदेशी बॅंकांमधील भारतीय काळ्या पैशावर देशातील कोट्यवधी गरिबांचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. संपूर्ण देशवासी, असा शब्दही त्यांनी उच्चारला नाही. हे पैसे आणले तर एका एका गरिबाला 15-20 लाख रुपये मिळू शकतात, असेही त्यांनी सांगितले. याचा अर्थ, पैसे खात्यात जमा होतील, असा होतो का ? परंतु, तसा गैरअर्थ काढून हेतुपूर्वक अपप्रचार सुरू आहे. तोही गरिबांकडून नव्हे, तर श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांकडून. विशेषत: राजकारण्यांकडून. ज्यांचा या 15-20 लाखांशी काडीचाही संबंध नाही याला आजकालच्या भाषेत Narrative म्हणतात. तो आपल्याला पाहिजे तसा सेट करायचा असतो. त्याप्रमाणे मोदी, भाजपा, संघ यांच्या विरोधकांनी एकत्र येऊन, ठरवून हा खोटेपणा केला आणि त्याची रेकॉर्ड देशभर मुद्दाम ठिकठिकाणी वाजविण्याची व्यवस्था केली.
परंतु, देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि कदाचित काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार (?) असलेल्या खडगेंसारख्या जबाबदार नेत्यानेही तेच करावे ? जे वाक्य मोदींनी उच्चारलेच नाही, त्याचा खोटा आधार घेऊन लोकांना भ्रमित करताना खडगेंना काहीच कसे वाटले नाही ? त्यांच्या आधी कन्हैयाकुमारनेही हेच म्हटले. पण त्याला मोजतो कोण ? राहिला प्रश्न राहुल गांधींचा. त्यांचे तर सोडूनच द्या. त्यांना कोणीच सिरियसली घेत नाही. पण खडगेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही खोटेनाटे ठोकून द्यायचे ? अशा खोटारडेपणाने संघाशी कसे लढाल लेकहो ? हेच का तुमचे “है तैयार हम !”
संघाबद्दल खडगे म्हणाले- “नागपुरमे दो विचारधाराएं चलती है। एक प्रगतिपर विचारधारा डॉ. आंबेडकरकी है और हमारे पीछे आरएसएसका बंगला है। यही आरएसएस आज देशको बरबाद कर रही है। मोदी आरएसएसका झंडा लेके आगे जा रहै है।”
दुसऱ्यांना नैतिकता शिकवायची, ज्ञान पाजायचे अन् स्वत: मात्र थापा मारायच्या, हा धंदा महागात पडू शकतो, खडगेजी. देश कोणी बरबाद केला आणि कोणी नीट सांभाळला, ते लोकांना चांगले माहीत आहे. म्हणून तर 2014 पासून तुमच्या पक्षाची दुर्दशा झाली आहे ना. नेहरू-गांधींच्या मागे आणखी किती काळ फरफटत राहाल अन् त्यापायी खोट्यांची बाजू घेऊन त्यांच्या कळपात सामील व्हाल !
– विनोद देशमुख