नागपूर :- नागपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक घोषणा करण्यात आल्या, परंतु एका पावसाने त्यांच्या स्मार्ट सिटीचा संपूर्ण फज्जा उडवला. यात मात्र सर्वसामान्यांची दैनावस्था झाली याला शासनकर्ते संपूर्ण जबाबदार आहेत, त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करावी असे आवाहन बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले आहे.
गडकरी यांनी आवश्यकता नसताना सामान्य वसाहतीतील अनेक रस्ते सिमेंट चे अतिउंच केले त्यामुळे रोडवरील सर्व पाणी सर्वसामान्याच्या घरात घुसते. नागनदी स्वच्छतेचे अभियान अनेक वर्षापासून मात्र धुळखात पडले आहे. उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही मग्रूर शासनाद्वारे अवैध स्मारक व पूल हटवण्यात आलेला नाही.
जोडतोडीच्या राजकारणामुळे राज्य सरकारचे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे त्यांच्या निवडणुकीकडे मागील दोन वर्षापासून दुर्लक्ष आहे. नाल्याची सफाई नाही, यातच महामेट्रोसाठी, वॉटर लाईनसाठी, सिमेंटीकरणसाठी शहरभर रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. ‘एक मात्र बरे आहे की शहर पाण्याने किंवा ट्राफिकने जाम झाले तरी शहरा बाहेरचा व्यक्ती शहराबाहेर महामेट्रो ने सर्वांच्या डोक्यावरून जाऊ शकतो’?
शहरात अनेक दिवसांपासून झोपडपट्ट्यांची व त्यांच्या मालकी पट्ट्याची समस्या आहे. इकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने ते बिचारे नदी-नाल्या किनारी चिखलात आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांचे आरोग्य, शिक्षण याच्याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. आता उद्या पूरपीडितांना आर्थिक मदतीची घोषणा करतील व निवडणुकी पर्यंत त्याची आश्वासने देतील पण पूर्ती करणार नाहीत. ही त्यांची राजनीति जनतेने ओळखली आहे. असा आरोप बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केला आहे.